पुणे – कौस्तुभ गिरगावकर व आद्या गवात्रे यांनी प्रत्येकी दोन गटांत विजेतेपद पटकावले आणि सहाव्या जिल्हा मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत दुहेरी मुकुट मिळविला. या स्पर्धेतील अन्य गटात श्रेयस माणकेश्वर व नभा किरकोळ यांनीही विजेतेपद मिळविले. पुरुष गटात चौथा मानांकित खेळाडू आरुष गालपल्ली हा विजेता ठरला.
जिल्हा टेबल टेनिस संघटनेच्या मान्यतेने आणि सिम्बॉयसिस क्रीडा केंद्रातर्फे सिम्बॉयसिस क्रीडा केंद्र येथे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेला इंडियन बॅंक, महाराष्ट्र बॅंक व युनियन बॅंक यांचे आर्थिक पाठबळ लाभले होते. मुलींच्या तेरा वर्षाखालील गटात आद्या हिने अंतिम फेरीत मृदुला सुरवसे हिच्यावर 10-12,9-11,11-6,11-4,11-6 असा विजय मिळवला. तिने पंधरा वर्षाखालील गटातही विजेतेपद मिळवले.
या गटात तिने खेळाडू सई कुलकर्णी हिच्यावर 11-5,11-7,11-7 असा दणदणीत विजय मिळविला. सतरा वर्षाखालील गटात सई कुलकर्णी हिला अंतिम फेरीत नभा हिच्याकडून पराभव पत्करावा लागला. नभा हिने काउंटर अटॅक पद्धतीचा सुरेख खेळ करीत हा सामना 11-9,5-11,11-4,11-9 असा घेतला.
मुलांच्या तेरा वर्षाखालील गटात श्रेयस याने अंतिम सामन्यात अनंत करमपुरी याला 11-6,11-5,11-4 असे सहज पराभूत केले. मात्र पंधरा वर्षाखालील गटाच्या अंतिम फेरीत त्याला कौस्तुभ गिरगावकर यांच्याकडून पराभव पत्करावा लागला.
कौस्तुभ याने ही अंतिम लढत 11-8, 14-12, 11-9 अशी जिंकली. त्याने सतरा वर्षाखालील गटाच्या अंतिम लढतीत खेळाडू प्रणव घोलकर याला पराभूत करीत आश्चर्याचा धक्का दिला. त्याने हा सामना 11-4, 13-11, 12-10 असा जिंकला.
पुरुष गटातील अंतिम सामना विलक्षण रंगतदार झाला. आरुष गलपल्ली याने वैभव दहिभाते याच्यावर नेत्रदीपक विजय मिळविला. त्याने हा सामना 9-11, 8-11, 10-12, 11-7, 11-8, 11-7, 11-4 असा जिंकला.