गणरायाच्या स्वागतासाठी सातारा शहरासह जिल्हा सज्ज

करोनाच्या संकटातही गणेशभक्तांचा उत्साह कायम; “एक गाव एक गणपती’ उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद
सातारा (प्रतिनिधी) –
“करोनाच्या जीवघेण्या विषाणूचे समूळ उच्चाटन कर’, असे साकडे घालत सातारा शहरासह संपूर्ण जिल्हा विघ्नहर्त्या गणरायाच्या स्वागतासाठी सज्ज झाला आहे. करोनाच्या संकटामुळे यंदा गणशोत्सव साधेपणाने व शासनाचे नियम पाळून होणार असला तरी गणेशभक्‍तांचा उत्साह कायम आहे. प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील बहुतांश सार्वजनिक मंडळांनी “एक गाव एक गणपती’चा निर्णय घेतला आहे. सातारा शहरात काही मंडळांनी गणेशोत्सव साजरा न करता सामाजिक उपक्रमांवर भर दिला आहे.

शाहूनगरीत भक्‍तांना गणरायाच्या आगमनाची उत्सुकता आहे. महागाई, बेरोजगारी यासारखे प्रश्‍न कायमच असतात; पण यंदा करोनाने जगात धुमाकूळ घातला आहे. ही विघ्ने गणराया दूर करणार, या विश्‍वासाने भक्‍तांनी गणरायाच्या स्वागताची जय्यत तयारी केली आहे. जिल्ह्यात तीन हजारांहून अधिक नोंदणीकृत सार्वजनिक गणेश मंडळे आहेत. गणरायाच्या आगमनापूर्वी भाद्रपद शुद्ध तृतीयेला घरोघरी महिलांनी उत्साहात हरतालिका पूजन केले.

गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला शाहूनगरीसह जिल्ह्यातील सर्व प्रमुख बाजारपेठा गर्दीने फुलून गेल्या होत्या. यंदा सजावट, देखावे, आगमन व विसर्जन मिरवणुकांना जिल्हा प्रशासनाने बंदी घातली आहे. सार्वजनिक मंडळांमध्ये केवळ चार फुटांपर्यंतच्या गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करणे अनिवार्य आहे. मर्यादित मांडव, कमी उंचीची श्रींची मूर्ती, मंडळात एका वेळी फक्‍त पाच कार्यकर्त्यांना उपस्थित राहण्यास परवानगी, या अटींमुळे उत्सवाचा भपकेबाज यंदा दिसणार नाही. गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला सजावट व पूजेचे साहित्य खरेदी करण्यासाठी भक्‍तांची लगबग सुरू होती. या लगबगीत सामाकि अंतराचे भान अनेक ठिकाणी सुटलेले दिसले. दुकानांमध्ये नागरिकांनी गर्दी केली होती.

मोती चौक ते पंचमुखी गणेश मंदिर परिसर गर्दीने गजबजला होता. राजपथावर देवी चौक ते राजवाडा या दरम्यान वाहतूक कोंडी झाली होती. लोकांनी रस्त्याच्या दुतर्फा वाहने लावल्याने कोंडीत अधिक भर पडली होती. वाहतूक सुरळीत करताना वाहतूक पोलिसांना कसरत करावी लागली. पोवई नाका, राजवाडा, मोती चौक, राजपथ, खण आळी येथे सजावटीच्या साहित्याची दुकाने सजली आहेत. तेथे खरेदीसाठी अधिक गर्दी होती. करोनामुळे बाजारपेठेवर मोठा परिणाम झाला आहे; परंतु गणेशोत्सवामुळे साताऱ्यात शुक्रवारी लाखो रुपयांची उलाढाल झाली. गणेशोत्सवात अनुचित प्रकार घडू नयेत यासाठी शहरात व जिल्ह्यातील महत्त्वाच्या ठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यंदा मुंबईतील अनेक चाकरमानी गणेशोत्सवासाठी जिल्ह्यात आले आहेत. त्यामुळे उत्साहाला उधाण आले आहे. सजावटीच्या साहित्यासह गणेशमूर्ती घरी नेण्यासाठीही नागरिकांची गर्दी झाली होती.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.