राजगुरूनगर – पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाच्या खेड तालुका सर्वसाधारण जागेसाठी माजी संचालक अरुण चांभारे आणि माजी संचालक चंद्रशेखर शेटे या दोघांमध्ये अटीतटीची लढत होत असून खेड तालुका मतदारसंघासाठी खेड तालुक्यात 100 टक्के मतदान झाले.
खेड तालुक्यात एकूण 106 दूध उत्पादक सोसायट्यांचे प्रतिनिधी मतदार आहेत. त्या सर्वांनी राजगुरुनगर येथील जिल्हा परिषदेच्या शाळा क्रमांक 1 मध्ये मतदानाचा हक्क बजावला. तालुक्यात अटीतटीची लढत असल्याने उमेदवारांनी आपल्या समर्थक सर्वच्या सर्व मतदारांचे मतदान करून घेतले. अनेक दिवसांपासून दोन्ही उमेदवारांनी आपले समर्थक मतदार राजकीय सहलीसाठी गेले होते; मात्र दोन्ही बाजूंचे काही मतदार तालुक्यातच थांबले होते.
दोन्ही बाजूंच्या मतदारांचे रविवारी (दि.20) मतदानासाठी आगमन झाले. पहिला 40 ते 45 मतदारांचा गट मतदानासाठी आला. अरुण चांभारे समर्थक मतदार भगवा फेटा घालून मतदानासाठी जात होते. त्यांची संख्या काहीशी जास्त दिसत होती; मात्र मतदान गुप्त पद्धतीने असल्याने मतदारराजा कोणाच्या बाजूने कौल दिला हे मात्र मतमोजणीतून समजणार आहे. दोघांच्या मतांमध्ये फारसा फरक राहणार नाही,अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. अटीतटीच्या या लढाईत कोण बाजी मारणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.