वडगाव मावळ, (प्रतिनिधी) – जागतिक चिमणी दिनाचे औचित्य साधून येथील मोरया प्रतिष्ठान व आविज फाऊंडेशनच्यावतीने वडगाव शहरातील सुमारे दीडशे पक्षी प्रेमींना चिमण्यांची कृत्रिम घरटी मोफत वाटप करण्यात आली.
यावेळी मोरया प्रतिष्ठानचे संस्थापक माजी नगराध्यक्ष मयूर ढोरे, आविज् फाउंडेशनचे संस्थापक अविनाश नागरे, माजी नगरसेविका पूनम जाधव आदींसह शहरातील पक्षीप्रेमी नागरिक उपस्थित होते.
लहानपणी आई-वडील अन्न भरविताना त्यांच्या तोंडून वाक्य ऐकू यायचं. एक घास चिऊचा, एक घास काऊचा परंतु, आज आपल्या त्या जैविक साखळीतून चिमण्या दिवसेंदिवस नामशेष होत चाललेल्या आहेत.
चिमण्यांची संख्या वाढावी या उद्देशाने मोरया प्रतिष्ठान व आविज्ञ फाउंडेशन यांच्यावतीने चिमणी संवर्धन प्रकल्प हाती घेतला आहे. त्यासाठी मोरया प्रतिष्ठानच्या जनसंपर्क कार्यालयात सुमारे २५० चिमण्यांची कृत्रिम घरटी बनविण्यात आली. नावनोंदणी केलेल्या सुमारे दीडशे पक्षी प्रेमी नागरीकांना त्यांचे वाटप केले.