नवी दिल्ली – गोव्यात बहुमत सिद्ध करण्यासाठी जर काही जागा कमी पडल्या तर महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टीबरोबर आघाडी करण्यासाठी भाजपचे केंद्रीय नेते चर्चा करत आहेत, अशी माहिती गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले.
जर बहुमतासाठी काही जागा कमी पडल्या तर अपक्ष आणि मगोपची मदत घेतली जाईल. मगोपच्या नेमक्या मागण्यांची आपल्याला कल्पना नाही. भाजपचे केंद्रीय नेते यासंदर्भात त्यांच्याशी चर्चा करत आहेत, असे सावंत यांनी आज सांगितले.
गोव्यातील निवडणूक निकालांसंदर्भात विविध वाहिन्यांनी वर्तवलेल्या मतदानोत्तर कल चाचण्यांच्या निकालांबाबत बोलताना “एक किंवा दोन वाहिन्या वगळता बहुतेक वाहिन्यांनी गोव्यात भाजपचे सरकार होईल, असा अंदाज वर्तवला आहे.’ असे सावंत यांनी सांगितले.
सावंत यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांना निवडणूकीशी संबंधित घडामोडींची माहिती दिली.
2017 च्या निवडणूकीत जरा कॉंग्रेस हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला होता, तरी मगोप आणि गोवा फॉरवर्ड पार्टी या स्थानिक पक्षांच्या मदतीच्या आधारे भाजपने सत्ता स्थापन केली होती. मात्र आताच्या विधानसभा निवडणूकीच्या आगोदर मगोपने ममता बॅनर्जींच्या तृणमूल कॉंग्रेसबरोबर आघाडी केल्याची घोषणा केली होती.