मुंबई – परिवहन मंत्री अनिल परब यांचे निकटवर्तीय आणि शिवसैनिक संजय कदम यांच्या घरावर आयकर विभागाने धाड मारली आहे. सकाळपासूनच कदम यांच्या घरावर आयकर विभागाने धाडसत्र सुरू केले आहे. तसेच पुण्यातील आरटीओचे अधिकारी बजरंग खरमाटे यांच्या घरावरही आयटीने छापा मारल्याची सूत्राची माहिती आहे.
स्थानिक शिवसैनिक संजय कदम यांच्या घरावर आज सकाळी आयकर विभागाने छापेमारी सुरू केली. अंधेरीच्या कैलास नगरमधील स्वान लेक कैलास या इमारतीतील 16 व्या मजल्यावर संजय कदम राहतात. कदम हे अनिल परब यांचे निकटवर्तीय असून केबल व्यावसायिक आहेत. त्यांच्या अंधेरीच्या घरी आयकर विभागाचे एक पथक आले असून त्यांनी छापेमारी सुरू केली आहे. त्यांच्या इमारतीच्या खाली केंद्रीय राखीव दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत.
राहुल कनालही रडारवर
युवासेनेचे पदाधिकारी राहुल कनाल यांच्या घरावरही छापा टाकण्यात आला आहे. कनाल हे मंत्री अदित्य ठाकरे यांचे जवळचे मानले जातात. राहुल हे उद्योजक असून शिर्डी संस्थानचे पदाधिकारीही आहेत. दरम्यान, आयकर विभागाच्या धाडीवर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मोजक्याच शब्दात प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. केंद्रीय यंत्रणा भाजपच्या प्रचार यंत्रणा, महाराष्ट्र झुकणार नाही, थांबणार नाही, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.
शिवसेना नेते संजय राऊत आज पत्रकार परिषदेत केंद्रीय यंत्रणांचा कथित भ्रष्टाचार उघड करणार होते. त्या अगोदरच हे छापे घालण्यात आले आहेत. सेनेने यावर टीका केली आहे, तर भाजपने मात्र या छाप्यांचे समर्थन केले आहे.