चऱ्होली – दिघी परिसरातील आदर्शनगरमधील साईलीला आदिवासी महिला बचत गटातर्फे शहरात नेहमीच खाद्य पदार्थांचे स्टॉल लावले जातात. पुणे शहरात भरणारी भीमथडी, इंद्रायणी थडी, पवनाथडी, कृषी प्रदर्शन व खेकडा महोत्सवातील खाद्यपदार्थांच्या चवीमुळे शहरात वेगळी ओळखी निर्माण झाली आहे. आता याच चवीचा मनसोक्त आनंद दिल्लीकर अनुभवत असून, महाराष्ट्रातील प्रमुख पदार्थांपैकी एक असलेल्या पुरणपोळी व बेसन भाकरीला पसंती देत दिल्लीतील आदि महोत्सवातील विदेशी पर्यटक सुद्धा पोटभरून ताव मारत असल्याची खमंग चर्चा आहे.
केंद्रीय आदिवासी विकास मंत्रालय आणि भारतीय आदिवासी सहकारी विपणन महामंडळ यांच्या वतीने दिल्लीतील मेजर ध्यानचंद नॅशनल स्टेडियम येथे आदि महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 16 ते 27 फेब्रुवारी दरम्यान या महोत्सवात देशभरातील आदिवासी कलाकारांच्या वस्तू, खाद्यपदार्थांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. महोत्सवात महाराष्ट्रातील फक्त दोन खाद्यपदार्थांचे स्टॉल असून, त्यापैकी एक पुणे जिल्ह्यातील दिघी गावच्या महिला बचत गटाला ही संधी मिळाली हे विशेष आहे. पुणे येथील महाराष्ट्र राज्य आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या वतीने या आदिवासी महिला बचत गटांना संधी निर्माण करून दिली आहे. तसेच या महिला बचत गटाने आदि महोत्सवात महाराष्ट्रातील खाद्यपदार्थांची चव व ओळख सातासमुद्रापार करून दिली आहे.
आदि महोत्सवात दिल्लीकरांसह विदेशी पर्यटकांना महाराष्ट्रातील व्यंजनाची भुरळ घातली आहे. प्रत्येक पदार्थाची चव घेत त्यांच्याकडून कौतुक होत आहे. ही आमच्या कामाची खूप मोठी पावती आहे.
– सीता गणपत किरवे, बचत गटाच्या अध्यक्षा.
गावरान चवीने घातली भुरळ
दिल्लीतील आदि महोत्सवात सहभागी होण्याची नामी संधी व प्रथमच महाराष्ट्राबाहेर जाऊन आपले खाद्यपदार्थ तेथील नागरिकांना पसंतीस पडतील का? या प्रश्नावर त्यांनी महाराष्ट्राच्या गावरान चवीचा आधार घेतला. मातीच्या मडक्यात शिजवलेली भाजी, बेसन भाकरी, खमंग पुरणपोळी, बाजरीची भाकरी, आळुवडी, कोथिंबीर वडी, मसाला मासवडी थाळी, नाचणीची भाकरी, कटाची आमटी, व्हेज पुलाव, शेंगदाणा गुळ पोळी, साबुदाणा वडा, गुळाचा चहा अशा अस्सल ग्रामीण बाज असलेल्या खाद्यपदार्थांची निवड केली व हीचं निवड सार्थ ठरली. यासाठी लागणारा गावरान मसाला घरी दगडी खलबत्त्यात बारीक करण्यात आला. तर दिल्लीकडे न मिळणारे जिन्नस सोबत घेऊन खाद्यपदार्थातील गावरान बाज
सांभाळला आहे.