बाधितांना जाहीर केलेली मदत तुटपुंजी

फेरविचार करावा अन्यथा आंदोलन : शिवसेनेचा इशारा

मंचर – अतिपावसाने शेतकऱ्यांच्या शेतीपिकाचे झालेल्या नुकसानीची आर्थिक मदत राज्यपालांनी अत्यंत तुटपुंजी जाहीर करुन शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. नुकसानभरपाईची मदत वाढवून द्यावी, अन्यथा शिवसेना पक्षाच्या वतीने आंदोलन केले जाईल, असा इशारा शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख सुरेश भोर यांनी दिला आहे.

शिवसेनेच्या वतीने मंचर येथे शिवसेनेचे उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयात शेतकरी मदत केंद्राचे उद्‌घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी भोर बोलत होते. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अरुण गिरे, राजाराम बाणखेले, उपजिल्हाप्रमुख सुनिल बाणखेले, युवासेनेचे महाराष्ट्र राज्य विस्तारक सचिन बांगर, युवासेना जिल्हा युवा अधिकारी प्रवीण थोरात, उपजिल्हा युवा अधिकारी कल्पेश आप्पा बाणखेले, ग्राहक संरक्षक कक्षाचे उपजिल्हाप्रमुख शिवाजीराव राजगुरू, शिवसेना उपतालुकाप्रमुख संतोष डोके, अशोक थोरात, विभागप्रमुख संजय चासकर, मंचर शहरप्रमुख संदीप जुन्नरे, वाहतूक सेनेचे तालुकाप्रमुख रामदास जाधव, प्रसिद्धी प्रमुख सदानंद कोल्हे, युवासेनेचे तालुका समन्वयक सुनिल गवारी, निकेश थोरात यांच्यासह पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.

परतीच्या पावसामुळे व बदलत्या हवामानामुळे हजारो हेक्‍टर लागवडीचे पीक संपुष्टात आले आहे. ओल्या दुष्काळामुळे व हाता-तोंडाशी आलेले पीक उद्‌ध्वस्त झाल्यामुळे आंबेगाव तालुक्‍यातील शेतकरी संपूर्ण कोसळला आहे. दुबार पेरणी आणि लागवड करावी लागणार असल्याने भांडवली खर्च भागवणे देखील अशक्‍य असून शेतकऱ्यांवर मोठे अस्मानी संकट कोसळले आहे.

यासंदर्भात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे, शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेच्या वतीने ओल्या दुष्काळाच्या प्रादुर्भावामुळे बाधित झालेल्या शेतीपिकांचे तत्काळ पंचनामे करून शासन दरबारात प्रस्ताव सादर करुन शेतकऱ्यांना दिलासा देण्यात यावा. तसेच भरीव आर्थिक नुकसान भरपाई देण्यात यावी. अशी मागणी करण्यात आली आहे.

पंचनामे करून घेण्याचे आवाहन
आंबेगाव तालुक्‍यात कृषी विभाग, महसूल विभाग व ग्रामविकास विभागाकडून बाधित क्षेत्राचे पंचनामे अंतिम करण्याचे काम सुरू असून उर्वरित शेतकऱ्यांनी संबंधित विभागाकडे अर्ज करून आपल्या बाधित क्षेत्राचे पंचनामे करून घ्यावेत, असे आवाहन शिवसेनेच्या वतीने शेतकऱ्यांना करण्यात आले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.