चाकणमध्ये जुन्या पुणे-नाशिक रस्त्यावरील अतिक्रमणे हटवली

महाळुंगे इंगळे – चाकण शहराची अतिक्रमण ही समस्या आता साधारण न राहता तिने गंभीर स्वरूप घेतले आहे. त्याबाबत ठोस पाऊल उचलून उपाययोजना करणे आवश्‍यक आहे. मात्र, “ये रे माझ्या मागल्या’प्रमाणे अतिक्रमण “जैसे थे’ राहत होते. त्याचा नाहक मनस्ताप वाहन चालकासहित पादचा-यांना भोगावा लागत होता. यामुळे येथील नगरपरिषदेने जुन्या पुणे-नाशिक रस्त्यावरील मराठी शाळेसमोरील अतिक्रमणे काढण्यात आली. ही कारवाई सलग दुसऱ्या दिवशीही सुरूच होती.

चाकण शहरातील जुना पुणे-नाशिक रस्त्यावरील माणिक चौक ते मार्केट यार्डपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या दुकाना पुढील मोकळ्या जागेत रस्त्यालगत पथारीवाले, हातगाडीवाले यांनी अतिक्रमण करून विविध प्रकारची दुकाने थाटली आहेत, तर काही दुकानदारांनी पेव्हर ब्लॉक लावून अतिक्रमण केले असून, त्यात भर म्हणून खरेदीसाठी येणारे ग्राहक आपली वाहने बिनदिक्‍कतपणे रस्त्याच्याकडेला लावून जातात. त्या वाहनामुळे होणारी वाहतूककोंडी होते.

प्रामुख्याने मुटकेवाडी कमान, माणिक चौक, नगरपरिषद परिसर, आंबेठाण चौक, बालाजी टॉवर, जय महाराष्ट्र चौक येथे अतिक्रमण व अस्ताव्यस्त वाहन लावल्यामुळे कोंडी नित्याचीच झाली आहे. यावर उपाययोजना म्हणून पोलीस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली आहे. यानंतर पुणे – नाशिक रस्त्यावरील मुटकेवाडी कंमान ते मार्केटयार्ड या दरम्यानमधील वाहतूकीला अडथळा ठरणारी सर्वच अतिक्रमणे हळूहळू काढण्यात येणार आहेत. त्यामध्ये या मार्गावरील टपरी धारक, भाजीपाला व्यावसायिक, पथारीवाले, मोठे फ्लेक्‍सचे सांगाडे व नावाचे नामफलक यांवरही कारवाई केली जाणार आहे.

चाकण शहरातील मुख्य रस्त्यावर वाहतुकीला अडथळा ठरणारी अतिक्रमणे काढण्यास सुरुवात करण्यात आली आहे. हळूहळू ही कारवाई सगळीकडे राबविण्यात येणार आहे. लहान मोठे व्यवसायिकांना आठवड्यातील एक दिवस व्यवसायासाठी सूट देण्यात येणार आहे.
– राजेंद्र पांढरपट्टे, उपमुख्याधिकारी, चाकण नगरपरिषद

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here