वेळ व पैसा जातो वाया
नगर – दिव्यांग प्रमाणपत्रासाठी जिल्ह्यात एकच दिव्यांग कक्ष आहे. ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर वैद्यकीय तपासणीसाठी हजारो दिव्यांगांना प्रतीक्षा यादीत राहावे लागत आहे. अनेकदा डॉक्टरांची उपस्थिती नसल्याने ग्रामीण भागातून येणाऱ्या दिव्यांगांना वैद्यकीय तपासणी न करताच परतावे लागते. ही बाब लक्षात घेता जिल्ह्यात तालुकास्तरावर दिव्यांग कक्षाची गरज निर्माण झाली आहे. एकच कक्ष असल्याने जिल्ह्यात दिव्यांगांना चांगलीच मनस्ताप सहन करावा लागत आहे.
जिल्हा शासकीय रुग्णालयात एकमेव दिव्यांगांची तपासणी होवून त्यांना प्रमाणपत्र देण्यात येत आहे. त्यासाठी एक दिवस ठरवून दिला आहे. त्यातही डॉक्टर उपलब्ध नसतील तर दिव्यांनांना वारंवार खेट्या माराव्या लागत आहे. या ठिकाणी दिव्यांग प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन अर्ज नि:शुल्क भरून दिला जातो; मात्र अर्ज भरल्यानंतर पुढील वैद्यकीय तपासणीसाठी दिव्यांगांना प्रतीक्षाच करावी लागत आहे. अनेकदा येथे डॉक्टरांची उपस्थिती नसल्याने वैद्यकीय तपासणीसाठी येणाऱ्या दिव्यांगांना तसेच परतावे लागते.
विशेष करून ग्रामीण भागातून येणाऱ्या दिव्यांगांसाठी ही मोठी डोकेदुखी ठरत आहे. ऑनलाइन अर्ज करूनही दिव्यांगांची वेळेत वैद्यकीय तपासणी होत नसल्याने दिव्यांगांना दिव्यांग प्रमाणपत्रासाठी प्रतीक्षाच करावी लागत आहे.
नगर जिल्हा सर्वात मोठा जिल्हा असल्याने दिव्यांना तपासणी व प्रमाणपत्रासाठी नगर येण्यासाठी वेळ व पैसा खर्चा करावा लागतो. त्यात डॉक्टरांची मनमानी असल्याने ते उपलब्ध असले तर ठिक नाही तर पुन्हा खेटा माराव्या लागतात. त्यात तालुकास्तरावर जिल्हा रुग्णालयाकडून शिबिराचे आयोजन करण्यात येत नाही. त्यामुळे दिव्यांना अनेक अडचणींवर मात करून या प्रमाणपत्रासाठी झगडावे लागत आहे.
वैद्यकीय तपासणीसाठी तारखांवर तारखा
वैद्यकीय तपासणीसाठी दिव्यांग कक्षात येणाऱ्या दिव्यांगांना तारखेवर तारीख दिल्या जात असल्याचे वास्तव आहे. उपलब्ध मनुष्यबळाच्या तुलनेत तपासणीसाठी येणाऱ्या दिव्यांगांची संख्या जास्त आहे. हा भार कमी करण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेऊन दिव्यांग कक्ष ग्रामीण भागापर्यंत पोहोचविण्याची गरज आहे.
ग्रामीण रुग्णालयांत दिव्यांग कक्षाची गरज
जिल्हा शासकीय रुग्णालयात एकमेव दिव्यांग कक्ष असून, त्यावर हजारो दिव्यांगांचा भार आहे. बहुतांश दिव्यांग हे ग्रामीण भागातील असल्याने त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी नेहमीच चकरा माराव्या लागत आहेत. ही बाब लक्षात घेता, दिव्यांगांसाठी तालुका स्तरावर दिव्यांग कक्षाची आवश्यकता आहे. हे कक्ष ग्रामीण रुग्णालयात स्थापन झाल्यास ग्रामीण भागातील दिव्यांगांना प्रमाणपत्रासाठी सोईस्कर ठरणार आहे.