पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरात सध्या प्रशासकीय राजवट सुरू आहे. नागरिकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी प्रशासनाने दर सोमवारी जनसंवाद सभा, सारथी आणि इतर हेल्पलाइन नंबर अशा सुविधा देऊ केल्या आहेत. परंतु आगामी काळात महापालिकेच्या निवडणुका होणार असल्याने काही माजी नगरसेवक आणि इच्छुकांनी आपआपल्या प्रभागात प्रशासनाच्या समांतर यंत्रणा निर्माण केली असल्याचे दिसून येत आहे. ही यंत्रणा पालिकेच्या कर्मचाऱ्यांपेक्षाही जलद प्रतिसाद देत असून नागरिकांच्या एका फोनवर समस्या सोडविण्यासाठी धावपळ सुरू होते. 2017 नंतर सुमारे चार वर्ष नागरिकांना आपल्या समस्या सोडवून घेण्यासाठी झगडावे लागत होते. परंतु आता प्रशासन आणि इच्छुक दोन्ही यंत्रणा त्यांच्या दिमतीस उभ्या असल्याचे दिसून येत आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेची मुदत 13 मार्च 2022 रोजी संपुष्टात आल्याने आजी नगरसेवक माजी झाले. महापालिकेत प्रशासकीय राजवट आली. आता कधीही महापालिकेची निवडणूक जाहीर होऊ शकते. यामुळे माजी नगरसेवकांसह इच्छुकही कामाला लागले आहेत. मात्र नागरिकांच्या समस्या सोडवायच्या कशा, असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे. त्यावरही काही इच्छुकांनी मात केली आहे. नागरिकांची कामे करण्यासाठी महापालिकेला समांतर अशी यंत्रणा उभारली आहे. यामुळे “एक कॉल, प्रॉब्लेम सॉल्व्ह,’ अशी स्थिती पहायला मिळत आहे. अशाच प्रकारची यंत्रणा काही माजी नगरसेवकांनी उभारली असून ते महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून काम करून घेत आहेत. अगदी कचरा उचलण्यापासून ते ड्रेनेज लाइन, धूर फवारणी अशा समस्या इच्छुक आपल्या खासगी यंत्रणेच्या माध्यमातून सोडवित आहेत.
माजी नगरसेवकांच्या शब्दाला मान
प्रशासकीय राजवट आली असली तरी तरीही आजही महापालिकेत माजी नगरसेवकांच्या शब्दाला मान आहे. ते सांगतील ती कामे अधिकारी करून देत आहेत. मात्र इच्छुकांचे तसे होत नाही. महापालिकेतील अधिकाऱ्यांना काम सांगितल्यावर ते काम करतीलच असे सांगता येत नाही आणि तसा अनुभवही इच्छुकांना येत आहे. यावरून क्षेत्रीय सभांमध्ये वादही होत आहे. अधिकारी माजी नगरसेवकांच्या बगलबच्च्यांना घेऊन फिरतात, असा आरोप होत आहे.
घरोघरी फिरून जाणून घेताहेत समस्या
इच्छुकांनी घरोघरी प्रचार करण्यास सुरुवात केली आहे. या प्रचारात मतदार कचरा साफ करून उचलणे, तुंबलेली ड्रेनेज लाइन साफ करणे, झाडांच्या फांद्या छाटणे, मच्छरांचा त्रास कमी करण्यासाठी धूर फवारणी करणे, अशा समस्या सांगत आहेत. कोणत्याही परिस्थितीत नगरसेवक व्हायचेच, असा चंग बांधून मैदानात उतरलेल्या इच्छुकांनी पैशाच्या जोरावर महापालिकेला समांतर अशी यंत्रणा उभारली आहे. प्रचारात इच्छुक पत्रकाद्वारे आपला मोबाइल क्रमांक नागरिकांना देत आहेत. फक्त फोन करून किंवा व्हॉट्सऍपला मेसेज करून काम सांगा. लगेच तुमचे काम करतो, असे आश्वासन दिले जात आहे. फोन येताच इच्छुकाचे पथक जाऊन काम फत्ते करून येते. इच्छुक स्थानिक नागरिकांसोबत काम करून घेत असतानाचे फोटोही सोशल मीडियावर टाकतात.