पुणे – फेसाळलेले धबधबे आणि हिरवळीने सजलेल्या घाटमाथ्यावर पावसात भिजत वर्षाविहाराचा आनंद घेण्यासाठी पुण्यासह आसपासच्या परिसरातील पर्यटकांनी मुळशी, ताम्हिणी, लोणावळा याठिकाणी सकाळपासून गर्दी केली. त्यात पावसाचा जोरही कमी झाल्यामुळे पर्यटक पर्यटनाचा आनंद घेत होते. मात्र, या आनंदात ठिकठिकाणी झालेल्या वाहतूक कोंडीने डोकेदुखी वाढवली.
मागील दोन दिवसांपासून घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे ताम्हिणी, लोणावळा, अंबवणे, शिरगांव या भागांत दोन दिवसांपासून पर्यटकांची गर्दी वाढलेली आहे. त्यात आषाढ महिना असल्याने पार्ट्यांनाही जोर आला आहे. रविवारी सुट्टीचा दिवस त्यामुळे सकाळपासून चांदणी चौकातून भुगाव, पौड मार्गे मुळशी आणि ताम्हिणी घाटाकडे जाणाऱ्या वाहनांची वर्दळ मोठी वाढली. त्यामुळे सकाळपासून भुगाव, पिरंगुट, घोटावडे फाटा, पौड फाटा आणि मुळशीतील धबधब्यांच्या ठिकाणी वाहनांची कोंडी झाली होती. त्यामुळे पर्यटनाचा निम्मा वेळ हा कोंडीतच गेला.
दरम्यान, आज पर्यटकांना पावसानेही साथ दिली. धो-धो पडणाऱ्या पावसाचा जोर कमी झाल्यामुळे पर्यटकांना मनासारखे फिरता आले. धबधब्यांखाली भिजण्याचा आनंद घेता आला. यावेळी गरमा गरम वडापाव, कांदाभजी खाणाऱ्यांनी छोट्या-मोठ्या हॉटेलवर गर्दी केले होती. लोणावळा, कार्ला येथील लेण्या, एकवीरा देवी याठिकाणी जाणारे पर्यटकही कोंडीत अडकल्याचे दिसून आले.
24 तासांत घाटमाथ्यावरील पाऊस (मिमीमध्ये) लोणावळा 40, शिरगाव 112, ठाकुरवाडी 22, वळवळ 41, अंबवणे 60, दावडी 81, डुंगरवाडी 65, ताम्हिणी 50.
पर्यटकांनी स्पॉट बदलले
मुळशी, ताम्हिणी आणि लोणावळा हे पर्यटकांचे आवडते ठिकाण. त्यामुळे शनिवार आणि रविवार सुट्टी आली की याठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी वाढते. मात्र, या गर्दीमुळे ठिकठिकाणी होणारी वाहतूक कोंडींमुळे पर्यटकांना यंदा पर्यटनाचे स्पॉट बदलल्याचे दिसून येते. काही पर्यटक वेल्हे तालुक्यातील डोंगरमाथ्यावर जात आहेत. तर काही पर्यटक पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्यावर फार्महाऊस बुक करून निवांत निसर्गाच्या सानिध्यात राहून आनंद घेताना दिसत आहे.