दिग्विजय देशमुख आयपीएलसाठी सज्ज
पुणे – सुशांतसिंह राजपूत याच्यासह चित्रपटात क्रिकेटपटूचा रोल निभावणारा महाराष्ट्राचा क्रिकेटपटू खऱ्या स्पर्धेत खेळण्यासाठी सज्ज बनला आहे. यंदा अमिरातीत होत असलेल्या आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्सकडून दिग्विजय पदार्पण करणार असून या स्पर्धेतील सहभागानंतर सुशांतसिंहला पुन्हा एकदा भेटण्याचे त्याचे स्वप्न मात्र आता अपूर्ण राहणार असल्याने त्याने खंत व्यक्त केली आहे.
दिग्विजयने प्रसिद्ध अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्यासह काय पो छे या 2013 साली प्रदर्शित झालेल्या हिंदी चित्रपटात काम केले होते. त्यात अली नावाच्या क्रिकेटपटूची भूमिका केल्याने त्याच्या नावाची चर्चाही खूप झाली होती.
सुशांतसह त्याची मैत्रीही बनली होती. त्यानंतर काळ पुढे सरकला व दिग्विजय खरेच क्रिकेटमध्ये एक गुणवान खेळाडू म्हणून ओळखला जाऊ लागला. त्याला सुशांतला भेटण्याची इच्छा होती. मात्र, सुशांतने आत्महत्या केल्याची बातमी समजल्यावर आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली.आता त्याला कधीच भेटता येणार नाही, अशा शब्दांत त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या.
या चित्रपटात सुशांत हाच दिग्विजयचा प्रशिक्षक असल्याचे दिसून आले होते. दिग्विजय वेगवान गोलंदाज असून यंदाच्या स्पर्धेसाठी झालेल्या लिलावात मुंबई इंडियन्सने त्याला खरेदी केले होते.