आळेफाटा- नगर-कल्याण महामार्गावर पिंपरीपेंढार (ता. जुन्नर) गावाच्या हद्दीत असलेल्या साईनगर येथे गुरुवारी (दि. 20) मध्यरात्रीच्या सुमारास एका अज्ञात वाहनाची धडक बसून बिबट्याचा जागीच मृत्यू झाला.
जुन्नर तालुका हा बिबट्या प्रणवक्षेत्र असलेला तालुका आहे. या ठिकाणी बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे या बिबट्या प्रणव क्षेत्रात कायमच बिबट्यांच्या हल्ल्यांच्या घडत असतात. या घटनांबरोबरच बिबट्यांचे अपघाती मृत्यूही होत आहेत.
गुरुवारी (दि. 20) मध्यरात्रीच्या सुमारास पिंपरीपेंढार येथील साईनगर शिवारातील राणबाबा मंदिराजवळ नगर-कल्याण महामार्ग पार करत असताना अंदाजे पाच ते सहा वर्षे वयाच्या एका नर जातीच्या बिबट्याला अज्ञात वाहनाने धडक दिल्यामुळे या बिबट्याचा जागीच मृत्यू झाला आहे या घटनेनंतर वनखात्याचे ओतूर वनपरीक्षेत्र अधिकारी योगेश गोडसे, वनरक्षक व्ही. टी. विभुते, वनपाल एस. के. साळुंके वनसेवक बी. के. खर्गे, वसंत जाधव, सुरेश गायकर, रेसक्यू टीमचे सदस्य बाबाजी खर्गे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन बिबट्याचा मृतदेह ताब्यात घेतला असून, या बिबट्याचे आळे येथे पिंपळवंडीचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. मंगेश खिलारी यांनी शवविच्छेदन केले. त्यानंतर त्याच ठिकाणी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
- बिबट्यांचे अपघात वाढले
बिबट्यांचे अपघात होण्याचे प्रमाण वाढत असून, यापूर्वीही याच महामार्गावर बिबट्याचा अपघाती मृत्यू झाला होता, तर पुणे-नाशिक महामार्गावर कांदळी गावाच्या हद्दीत पण बिबट्याचा अपघाती मृत्यू झाला होता. बिबट्यांचे वारंवार अपघाती मृत्यू होत असल्यामुळे बिबट्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे