उमेश सुतार
कराड – कराड तालुक्यातील खालकरवाडी, चरेगाव, शितळवाडी या परिसरात विज वितरणच्या कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार सुरु असून या भागातील वारंवार खंडित होणाऱ्या विजपुरवठ्याकडे संबंधित वायरमन दुर्लक्ष करीत असल्याने कुणी वायरमन देता का? असे म्हणण्याची वेळ या परिसरातील शेतकऱ्यांवर आली आहे.
खालकरवाडी, चरेगाव फाटा, शितळवाडी या परिसरासाठी विज वितरणने स्वतंत्र ट्रान्सफॉर्मर बसवलेला आहे. येथूनच या परिसरात विजेचा पुरवठा केला जातो. यासाठी कंपनीने स्वतंत्र वायरमनची नेमणूक केलेली आहे. मात्र संबंधित वायरमनने स्वतःच्या सोयीसाठी परस्परच एक पगारी खाजगी कामगार याठिकाणी नेमला आहे. तो कामगार किरकोळ स्वरुपाची कामे करतो. मात्र ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड झाल्यास त्याची दुरुस्ती करण्याविना या परिसरातील विज वारंवार खंडित राहण्याचे प्रकार होत असतात. यामुळे या परिसरातील व्यापारी, दुकान व्यवसायिक यांचे मोठे नुकसान होत असते. त्याबरोबर शेतकऱ्यांचे नुकसान होत असते.
याचे विजवितरणच्या अधिकाऱ्यांना कसलेही सोयरसूतक वाटत नाही. याबाबत ग्रामस्थांमधून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. संबंधित वायरमनने खाजगी कामगार ठेवलेला असतानाही वरिष्ठ अधिकारी या गोष्टींपासून खरोखर अनभिज्ञ आहे कि या वायरमनला पाठीशी घालत आहेत? हा प्रश्न अनुत्तरित आहे. कामात कुचराई करणाऱ्या संबंधितास अधिकाऱ्यांनी समज द्यावी, अशी मागणी शेतकरी तसेच व्यापारी करीत आहेत.
संबंधित वायरमन महाशय पंधरा-पंधरा दिवस लाईनवर येत नाहीत. त्यांचा स्वयंघोषित कामगार हा फक्त सकाळी दहा ते पाच यावेळेतच काम करतो. त्यामुळे रात्रीच्यावेळी फ्युज गेली किंवा इतर काही घोटाळा झाला तर नेमलेला कर्मचारी लाईनवर येत नसल्याने शेतकऱ्यांना शेतीला पाणी पुरवठा करता येत नाही. चाफळ फाटा परिसरात दुकानदारांचे प्रमाण लक्षणीय आहे. वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने दुकानदारांचे फ्रिजमधील दुग्धजन्य पदार्थ खराब होऊन हजारो रुपयांचे नुकसान होत असून याकडे अधिकाऱ्यांनी लक्ष देवून पूर्णवेळ वायरमन द्यावा, अशीही मागणी जोर धरीत आहे.
चरेगावफाटा, खालकरवाडी, शितळवाडी या परिसरात असलेला वायरमनचे दुर्लक्ष झाल्यामुळेच या परिसरात वारंवार खंडित होणाऱ्या विजेमुळे दुकानदार, व्यापारी, शेतकरी वर्गाला नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याठिकाणी पूर्णवेळ काम करणारा वायरमन मिळावा.
शिवतेज डुबल, माजी उपसरपंच, चरेगाव