शिरूर शहरापासून हाकेच्या अंतरावरील बोऱ्हाडे मळ्याजवळील घटना
शिरूर – पुणे-नगर महामार्गावर शिरूर शहरापासून हाकेच्या अंतरावर बोऱ्हाडे मळ्याजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाला आहे, त्यामुळे शिरूर शहर, बाबूरावनगर, बोराडे मळा, महाजन मळा, रामलिंग परिसरामध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. ही घटना गुरुवारी (दि. 2) रात्री सव्वादहाच्या सुमारास घडली.
याबाबत वनपरिक्षेत्र अधिकारी एन. एम. म्हसेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री बोऱ्हाडेमळाजवळ वाहनाच्या धडकेने बिबट्याचा मृत्यू झाल्याची माहिती वनाधिकाऱ्यांना फोनवरून मिळाली. यानंतर वन कर्मचाऱ्यांनी तेथे जाऊन पंचनामा केला आहे. पशुवैद्यकीय अधिकारी सातकर यांनी या बिबट्याचे शवविच्छेदन केल्यानंतर त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
हा नर जातीचा बिबट्या चार ते पाच वर्षांचा असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी म्हसेकर यांनी सांगितले. नगर रस्त्यावर रस्ता ओलांडताना हा अपघात झाला असून, बिबट्याच्या तोंडाला गंभीर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याचे अधिकारी म्हसेकर यांनी सांगितले.
शिरूर शहराभोवती बिबट्याचा वावर
शिरूर शहर, बाबूरावनगर, बोऱ्हाडे मळ्यामधील अंतर कमी आहे. हा भाग मोठ्या लोकवस्तीचा आहे. तीन महिन्यांपूर्वी एका चारचाकी वाहन चालकाने जांभळी थापा परिसरात बिबट्या दिसल्याचे सांगितले होते; परंतु त्यानंतर वनाधिकाऱ्यांनी तेथे जाऊन पाहणी केल्यावर हा बिबट्या नसून तरस असल्याचे सांगितले होते. आता बोऱ्हाडे मळ्यजवळ पुणे-नगर रस्त्यावर झालेल्या अपघातात बिबट्या ठार झाला आहे. त्यामुळे शिरूर आणि आसपासच्या परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे निदर्शनास आले आहे.