पुणे – महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयातील डायलिसिस सेंटरमधील पंधरापैकी तब्बल तेरा मशिन बंद आहेत. त्यामुळे रुग्णांची गैरसोय होत आहे. शहरातील गरजू रुग्णांना अल्प दरात डायलिसिस करून घेता यावे, या हेतूने महापालिकेने सन 2016 पासून हे सेंटर “लायन्स क्लब ऑफ पूना मुकुंदनगर चॅरिटेबल ट्रस्ट’ या संस्थेला चालवण्यास दिले आहे. ट्रस्टने कोणतेही कारण अथवा पूर्वसूचना न देता नुकतेच हे केंद्र दीड दिवस बंद ठेवले. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाइकांनी महापालिकेकडे तक्रारी केल्या.
त्यामुळे महापालिकेच्या सहायक आरोग्य अधिकारी डॉ. मनीषा नाईक यांनी या सेंटरची नुकतीच पाहणी केली. त्या वेळी येथे नेफ्रालॉजिस्ट अथवा डॉक्टर्स तसेच प्रशिक्षित परिचारिका कार्यरत नसल्याचेही आढळले. त्यामुळे महापालिका प्रशासनाने ट्रस्टवर हे सेंटर चालवण्यास असमर्थ असल्याचा ठपका ठेवत खुलासाही मागितला आहे. पाच वर्षांचा कालावधी संपल्यानंतर त्यांना पाच वर्षांची मुदतवाढ देण्यात आली.
या डायलिसिस सेंटरमध्ये निर्माण होणारा जैव वैद्यकीय कचरा मागील सुमारे एक ते दीड वर्षापासून साठवून ठेवला आहे. त्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावल्याचे दिसत नाही. त्यामुळे या प्रकरणी पालिकेने या सेंटरला 25 हजार रूपयांचा दंड केला आहे, असे मनपाचे सहायक आरोग्य अधिकारी डॉ. मनीषा नाईक म्हणाल्या.
संस्था म्हणते, आमचे बिल थकवले
“महापालिकेने आमचे फेब्रुवारीपासूनचे सुमारे 15 लाख रुपयांचे बिल दिले नाही. त्यामुळे आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. या केंद्रातील काही मशिन जुन्या झाल्याने ते बदलण्याचे काम सुरू आहे. प्रशासकीय अडचणी दूर झाल्यानंतर हे केंद्र पुन्हा योग्य क्षमतेने चालवण्यात येईल,’ असे लायन्स क्लब ऑफ पुणे मुकुंदनगर चॅरिटेबल ट्रस्टच्या प्रतिनिधींनी सांगितले.