न्यूयॉर्क : चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च मानाचा समजला जाणारा पुरस्कार म्हणून ऑस्कर ओळखला जातो. यंदाचा ऑस्कर भारतासाठी खास आहे. कारण ‘आरआरआर’ चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाण्याला ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. गाण्याला बेस्ट ओरिजनल साँग पुरस्कार मिळाले आहे. आरआरआर चित्रपटाचे दिग्दर्शक एस.एस.राजामौली, अभिनेता ज्युनिअर एनटीआर व राम चरण ऑस्कर सोहळ्यासाठी उपस्थित राहिले. या सोहळ्यातील त्यांच्या लूक समोर आला आहे.
ऑस्करसाठी राम चरण व ज्यु. एनटीआरने काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये खास लूक केला आहे. तर या सोहळ्यातील राजामौलींच्या लूकने सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतले आहे. त्यांच्या या देसी लूकची सध्या सर्वत्र चर्चा असल्याचे पाहायला मिळत आहे.
View this post on Instagram
राजामौलींनी ऑस्करसाठी खास देसी लूक केला आहे. पांढरे धोतर व गुलाबी रंगाचा कुर्ता अशा पारंपरिक पेहरावात राजामौली ऑस्कर सोहळ्यात दिसून आले. ऑस्कर सोहळ्यातील राजामौलींच्या या लूकचा फोटो आरआरआरच्या ऑफिशियल इन्स्टाग्राम पेजवरुन शेअर करण्यात आला आहे. ऑस्कर सोहळ्यातील त्यांचा खास लूक चर्चेत आहे.
राजामौली दिग्दर्शित आरआरआर हा चित्रपट २४ मार्च २०२२ रोजी प्रदर्शित झाला होता. ज्यु. एनटीआर व राम चरण मुख्य भूमिकेत असलेल्या या चित्रपटाने केवळ देशभरात नाही तर जगभरात डंका वाजवला होता. ‘आरआरआर’मधील ‘नाटू नाटू’ या गाण्याची क्रेझ आजही कायम आहे.