आयपीएलमधील धोनीचा दबदबा संपला – चोप्रा

चेन्नई – एकेकाळी आयपीएल स्पर्धेतील सर्वात बलाढ्य संघ अशी ओळख असलेल्या महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंग्ज संघाचा या स्पर्धेतील दबदबा संपुष्टात आला आहे. गेल्या वर्षी त्यांना या स्पर्धेत अत्यंत दारूण पराभव पत्करावे लागले होते, यंदाही त्यांचा संघ फार दिमाखदार कामगिरी करू शकेल असे मला वाटत नाही, अशा शब्दात माजी कसोटीपटू व समालोचक आकाश चोप्राने आपले निरिक्षण नोंदवले आहे.

धोनीने जेव्हा संघाचे नेतृत्व करताना पुढाकार घेत सरस कामगिरी केली ते दिमाख आता दिसून येत नाही. यंदा ते प्लेऑफमध्येही स्थान मिळवतील की नाही ते सांगता येत नाही. गेल्या वर्षी तर त्यांना स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात मोठी नामुष्की पत्करावी लागली होती. गेल्या स्पर्धेत पूर्वीचा धोनी कुठेही दिसला नाही. तो संघाचे नेतृत्व करताना तर चुकत होता. पण वैयक्‍तिक कामगिरीतही अपयशी ठरला. धोनीच्या या अपयशाचा सर्वाधिक फटका चेन्नईच्या संघाला बसला. यंदाही फार काही वेगळे चित्र दिसेल असे वाटत नसल्याचे चोप्राने सांगितले.

दोन वर्षांपूर्वी चेन्नई व मुंबईचा संघ स्पर्धेतील बलाढ्य संघ म्हणून गणले जात होते. मात्र, गतवर्षापासून चेन्नईची ही मक्तेदारी संपली. मुंबईचा संघ अद्याप भक्‍कम असला तरी चेन्नईच्या संघाचे वर्चस्व आता राहिले नाही हे देखील मान्य करावे लागेल. त्यांच्या संघात निवृत्ती घेतलेले खेळाडूच जास्त आहेत. तसेच त्यांच्या संघात असेही काही खेळाडू आहेत की ज्यांनी गेल्या वर्षभरापासून क्रिकेट खेळलेले नाही. सुरेश रैना, अंबाती रायडू किंवा दीपक चहर अशा खेळाडूंच्या बळावर ही स्पर्धा यंदा ते जिंकतील याची खात्री कोणीही देणार नाही. स्वतः धोनीदेखील सर्वोत्तम फॉर्ममध्ये नाही. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यापासून त्याचाही मिडास टच कुठेतरी हरवला आहे. अशा परिस्थितीत त्यांच्या यशाची अपेक्षा करणेही चूक ठरेल, असेही चोप्राने नमूद केले.

दिल्लीशी सलामीची लढत

आयपीएल स्पर्धेच्या यंदाच्या मोसमाला 9 एप्रिलपासून प्रारंभ होत आहे. या स्पर्धेतील चेन्नई सुपर किंग्ज संघाची सलामीची लढत ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्स संघाशी होणार आहे. या सामन्याद्वारे चेन्नईची मोहिम सुरू होणार असली तरी ते बाद फेरी गाठणार असे ठामपणे सांगता येत नाही. एकीकडे धोनीला आपल्या वैयक्‍तिक कामगिरीकडे लक्ष द्यायचे आहे तर दुसरीकडे संघाच्याही कामगिरीबाबत सतर्क राहायचे आहे. या दोन्ही आघाड्या तो कितपत सांभाळतो हेच पाहणे महत्त्वाचे ठरेल, असेही चोप्रा म्हणाला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.