नवी दिल्ली – ऑस्ट्रेलियातील जंगलात काही दिवसांपूर्वी भीषण आग लागली होती. या आगीत हजारो प्राण्यांना जीव गमवावा लागला. हजारो प्राणी जखमी झालेत. तर, अनेक नागरिकांना स्थलांतर करावे लागले. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने पुढील महिन्यात फेब्रुवारीमध्ये आग पीडितांच्या मदतीसाठी एका सामन्याचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात क्रिकेटमधून निवृत्त झालेले दिग्गज खेळाडू खेळणार आहेत. मीडिया रिपोर्टनुसार या सामन्यात सचिन तेंडुलकर आणि महेंद्र सिंह धोनी देखील खेळण्याची शक्यता आहे.
मदतनिधीसाठीचा सामना 8 फेब्रुवारी रोजी होणार आहे. या संघाचे नेतृत्व रिकी पॉन्टिंग करणार असून दुसऱ्या संघाचे नेतृत्व शेन वॉर्न करणार आहे. ब्रेट ली, जस्टिन लॅगर, मायकल क्लार्क, ऍडम गिलख्रिस्ट, शेन वॉटसन आणि ऍलेक्स ब्लॅकवेल हे खेळाडू देखील या सामन्यात खेळणार आहेत. मदतनिधी सामन्यातून जमा होणारी रक्कम ऑस्ट्रेलिया रेड क्रॉस संघटनेला दिली जाणार आहे.