– अमोल कचरे
यंदा “पिफ’मध्ये वर्ल्ड कॉम्पिटिशन या स्पर्धा विभागात उत्कृष्ट चित्रपट या पुरस्कारासाठी मारिघेला, “ऍडल्ट्स इन द रूम’ यांबरोबरच ट्युनिशिया, लेबनॉन, कतार या देशामधील “अ सन’ हा चित्रपटसुद्धा विजेतेपदाचा दावेदार आहे. त्यामुळेच यंदा “तगडी स्पर्धा’ या विभागात बघायला मिळतेय. जाणून घेऊयात “अ सन’ या फिल्म विषयी…
फरीस, मरियम आणि त्यांचा 9 वर्षांचा मुलगा अझीझ हे त्रिकोणी कुटुंब वीकेन्ड एन्जॉय करण्यासाठी दक्षिण ट्युनिशियामध्ये त्यांच्या गाडीतून प्रवास करत असतात. अचानक एके ठिकाणी एका बंडखोर सशस्त्र दलातर्फे फरीसच्या गाडीवर गोळीबार होतो. फरीस लागलीच तिथून गाडी उलट्या दिशेने वळवतो. आपली पत्नी मरियम आणि मुलगा अझीझ यांना काही झालेलं तर नाही ना या काळजीत फरीस असतो. मरियम सुखरूप असते, पण अझीझला मात्र एक गोळी लागते. फरीस तातडीने अझीझला जवळच्या रुग्णालयात दाखल करतो. परिस्थिती अशी उद्भवते, की अझीझला यकृत प्रत्यार्पण करावे लागणार असते.
आई-वडिलांपैकी एकाचे यकृत डोनर म्हणून देता यावे, यासाठी फरीस आणि मरियम या दोघांची डीएनए टेस्ट घेतली जाते. यात आई म्हणून मरियम रक्तगट वेगळा असल्याने रिजेक्ट होते. मात्र, फरीस हे अझीझचे वडील नसल्याची नवीन माहिती डीएनए टेस्टमधून मिळते.
हे फरीसला कळल्यावर तो मरियमवर प्रचंड संतापतो आणि अझीझला वाचवण्यासाठी त्याच्या खऱ्या वडिलांचा शोध घेण्यासाठी मरियमला सांगतो. पुढे जाऊन बेकायदेशीर पणे यकृत प्रत्यार्पण करणाऱ्या एजंटांना फरीस भेटतो. इकडे मरियम अझिझच्या खऱ्या वडिलांचा शोध घेत असते. अझीझच्या खऱ्या वडिलांचा शोध लागतो का ? यकृत प्रत्यार्पण यशस्वी होतं का ? फरीस आणि मरियम यांच्या नात्यात आलेले वितुष्ट जाते का? या सर्व प्रश्नांसाठी हा चित्रपटच पाहावा लागेल.
मेहदी बारसावुई यांच्या उत्कृष्ट दिग्दर्शनामुळे हा चित्रपट उत्कंठावर्धक झालाय. शेवट पर्यंत नेमकं काय होणार याचीच उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिलेली असते. पटकथासुद्धा मेहदी यांचीच असल्याने या दर्जेदार चित्रपटाचे पूर्ण श्रेय हे मेहदी यांनाच जाते. आणखी एक दर्जेदार कलाकृती यंदा “पिफ’मध्ये पाहायला मिळाल्याने डेलिगेट्स खुश असून उत्कृष्ट चित्रपट हा पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळणार, याचीच उत्सुकता सर्वांमध्ये आहे.