विखे गटाकडून जिल्हा बॅंक निवडणुकीत लक्ष ः कोणाची लागणार वर्णी
जामखेड – भाजपच्या तालुकाध्यक्ष निवड पुढील आठवड्यात होणार असून, या पदासाठी कर्जत जामखेड विधानसभा अध्यक्ष डॉ. भगवान मुरूमकर, पिंपरखेडचे सरपंच बापूराव ढवळे व ज्योती क्रांती संस्थेचे अध्यक्ष आजीनाथ हजारे यांच्या व्यतिरिक्त इतर तीन ते चार जण स्पर्धेत आहेत.
विद्यमान तालुकाध्यक्ष रवींद्र सुरवसे हे सलग सात वर्षांपासून अध्यक्ष आहेत. तसेच त्यांची पत्नी उपसभापती असून प्रभारी सभापती असल्यामुळे त्यांचा त्या पदावरील हक्क संपुष्टात आला आहे. माजी मंत्री राम शिंदे यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर त्यांनी विखे पिता-पुत्रांवर विरोधी प्रचार केल्याचा आरोप ठेवल्याने येथील विखे गटात शांतता आहे. त्यांनी जिल्हा बॅंक निवडणुकीकडे लक्ष केंद्रित केले आहे. तालुकाध्यक्षपदासाठी तीव्र चुरस असल्याने माजी मंत्री राम शिंदे कोणाची वर्णी लावतात, याकडे या निवडीकडे लक्ष लागले आहे.
राज्यातील सत्ताबदल व माजी मंत्री राम शिंदे यांचा विधानसभा निवडणुकीत झालेला पराभव, यामुळे तालुक्यातील भाजपमध्ये मरगळ आली होती. पंचायत समिती सभापती, उपसभापती निवडीच्यावेळी ऐनवेळी भाजपला कौल मिळाला. त्यामुळे भाजपत नवचैतन्य आले. या पाश्वभूमीवर तालुकाध्यक्ष निवड होत आहे. विद्यमान तालुकाध्यक्ष रवींद्र सुरवसे यांची एकवेळा फेरनिवड झाल्यामुळे ते मागील सात वर्षांपासून अध्यक्ष राहिले आहेत. तसेच तालुकाध्यक्षपद खर्चिक असल्याने या पदासाठी कोणी धजत नव्हते.
पण मागील सात वर्षांत अध्यक्षपदाचा असलेला डामडौल पाहता या पदासाठी चुरस निर्माण झाली आहे. जामखेड पंचायत समितीचे माजी सभापती डॉ. भगवान मुरूमकर हे पंचायत समितीचे विद्यमान सदस्य आहेत. तसेच कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष आहेत. पंचायत समितीचे सभापतिपद नागरिकांचा इतर मागासवर्गीय प्रवर्गातील निघाले होते. परंतु काही राजकीय घडामोडींमुळे त्यांना पदापासून दूर व्हावे लागले आहे. त्यामुळे भाजप तालुकाध्यक्ष पदासाठी ते हक्क सांगणार आहेत.
पिंपरखेडचे सलग दहा वर्षे सरपंच असलेले बापूराव ढवळे अडीच वर्षांपूर्वी भाजपमध्ये आले होते. त्यांनी मागील अडीच वर्षांत पक्षासाठी मोठे योगदान दिले आहे. तसेच पक्षात सक्रिय राहीले आहे. कामाची पद्धत व वक्तृत्व तसेच माजी मंत्री शिंदे यांची त्यांच्यावर मर्जी आहे. तसेच ढवळे यांच्या नावाला पक्षातून पाठिंबा आहे. डॉ. भगवान मुरूमकर, बापूराव ढवळे यांच्या व्यतिरिक्त खर्डा सरपंच संजय गोपाळघरे, बांधखडकचे सरंपच केशव वनवे, जवळ्याचे सरपंच प्रशांत शिंदे, नान्नजचे माजी सरपंच संतोष पवार, सारोळ्याचे सरपंच अजय काशीद, नगरसेवक अमित चिंतामणी, बिभीषण धनवडे, पांडुरंग उबाळे, गणेश जगताप आदी तालुकाध्यक्ष पदासाठी इच्छुक आहेत. जिल्हा सहकारी बॅंकेची निवडणूक तोंडावर आली असून, सेवा संस्थेचे ठराव घेण्याची प्रक्रिया चालू झाली आहे.
त्यासाठी विद्यमान संचालक जगन्नाथ राळेभात व त्यांच्या गटाने लक्ष केंद्रित केले आहे. विधानसभा निवडणुकीत माजी मंत्री शिंदे यांचा पराभव झाला. त्यानंतर त्यांनी विखे गटावर पराभवाचे खापर फोडले होते. त्यामुळे तालुक्यातील विखे गट तालुकाध्यक्ष पदापासून चार हात लांब आहे. पुढील आठवड्यात तालुकाध्यक्षपदासाठी निवडणूक होईल की बिनविरोध, याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.