गणेश घाडगे
नेवासा – नेवासे तालुक्यातील महसूल अधिकाऱ्यांच्या उदासीन भूमिकेमुळे अवैध गौणखनिज उपसा जोरात सुरू आहे. त्यामुळे शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.
नेवासा तालुक्यात सध्या अनेक ठिकाणी डांबरी रस्त्यांची कामे सुरू आहेत. त्यासाठी मोठ्या प्रमाणात मुरमाचा वापर करण्यात येत आहे.
मात्र ठेकेदारांकडून सरकारी जमिनीवरील मुरूम विना परवाना उचलला जात आहे. याबाबत परिसरातील शेतकऱ्यांनी व ग्रामस्थांनी वारंवार तक्रारी करूनही त्याकडे महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. तसेच याबाबत जाब विचारला असता अधिकारी व कर्मचारी उडवाउडवीची उत्तरे देऊन ठेकेदार व गौणखनिज माफियांना पाठीशी घालत असल्याचे चित्र आहे. तहसीलदारांकडेही अनेक वेळा याबाबत तक्रारी करण्यात आल्या आहेत. मात्र ते या शेतकऱ्यांना भेट देण्यास टाळाटाळ करत आहेत.
तालुक्यातून अनेक मोठ्या नद्या वाहत आहेत. यंदा पाऊस देखील मोठ्या प्रमाणात झाल्याने नदीपात्र नवीन वाळूने भरले असल्याने माफियांची त्यावरही चोरटी नजर आहे. वाळूचाही रात्रीच्यावेळी मोठ्या प्रमाणात अवैध उपसा सुरू आहे. अधिकारी मात्र शेतकऱ्यांना वेठीस धरण्यास मजा मानत असल्याची चर्चा सध्या तालुक्यात रंगू लागली आहे.
गावोगावी सरकारी असलेल्या वन, गायरण व अन्य जमिनींवरील मोठाले वृक्ष तोडून मुरूम उपसा जोरात सुरू आहे. लाखो रुपयेचा कर चुकवून महसूल अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने हा धंदा जोमत सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे या माफियांवर कारवाई कधी होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
रात्री होते गौणखनिजाची चोरटी वाहतूक
गौण खनिज वाहतूक आणि उत्खननाबरोबरच चोरट्या वाळूची वाहतूक रात्रीच्या वेळी होत आहे. अनेक ठिकाणी वाळूचे ढीग साठविले जात आहेत. याची माहिती महसूल कर्मचाऱ्यांना कशी काय मिळत नाही, याची चर्चा सध्या परिसरात सुरू आहे.