धाराशिव :- लोहारा तालुक्यातील भूकंपप्रवण भागात बुधवारी सायंकाळी भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला आहे. लातूर येथील भूकंप मापन केंद्रावर 1.8 रिश्टर स्केलची नोंद झाली आहे.
या भूकंपाचा केंद्रबिंदू सास्तूरनजीक असल्याचे सांगण्यात आले. हा भूकंपाचा धक्का तालुक्यातील 10पेक्षा अधिक गावांत जाणवला आहे. या भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी किंवा कोणत्याही प्रकारचे नुकसान झालेले नाही.
दरम्यान, 1993 साली झालेल्या महाप्रलयंकारी भूकंपाच्या आठवणींनी आजही उमरगा आणि लोहारा तालुक्यातील नागरिक भावुक होतात. याच भूकंप प्रवण क्षेत्रातील लोहारा तालुक्यात बुधवारी सायंकाळी 4:32 वाजण्याच्या सुमारास जमीन हादरली.
तालुक्यातील सास्तूर, होळी, उर्शदपूर, तावशी, माकणी, गुबाळ, राजेगाव, रेबेचिंचोली, उदतपूर आदी गावांमध्ये भूकंपाचा हादरा जाणवल्याने नागरिक भयभीत झाले. अनेकांनी घरातून बाहेर पळ काढला.