संगमनेर -धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील धनगर समाज आक्रमक झाला आहे. सकल धनगर समाजाच्या मल्हार सेनेच्या वतीने तालुक्यातील तळेगाव येथे अर्ध जलसमाधी आंदोलन करत आरक्षण देण्याची मागणी करण्यात आली. तसेच मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल, असा इशाराही संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.
राज्यात मराठा आरक्षणाच्या पाठोपाठ धनगर आरक्षणाचा मुद्दाही पेटू लागला आहे. धनगर समाजाचा एसटीमध्ये समावेश करावा, या प्रमुख मागणीसह इतर मागण्या पूर्ण व्हाव्यात, यासाठी धनगर समाज रस्त्यावर उतरताना दिसू लागला आहे. तळेगाव दिघे येथे मल्हार सेनेचे कार्यकर्ते सोपान कांदळकर, अण्णासाहेब कांदळकर व संतोष कांदळकर यांच्या नेतृत्वाखाली धनगर समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी भवानी आई मंदिर परिसरातील तलावात अर्ध जलसमाधी आंदोलन करण्यात आले. तळेगाव दिघे चौफुली येथून घोषणा देत आंदोलक तलावापर्यंत पोहचले. केवळ दहाच कार्यकर्त्यांना तलावात प्रातिनिधिक आंदोलन करण्याची मुभा संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभय परमार यांनी दिली होती.
आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे, अशी जोरदार घोषणाबाजी यावेळी करण्यात आली. आंदोलनात मल्हार सेनेचे कचरू कांदळकर, दत्तात्रय कांदळकर, रेवणनाथ शिंदे, दिलीप कांदळकर, रोहिदास कांदळकर, सुखदेव लाटे, ज्ञानदेव कांदळकर, ज्ञानेश्वर कांदळकर, संतोष मोरे, गंगाधर कांदळकर, गंगाधर साळवे, झुंगा कांदळकर, कोंडाजी कांदळकर, गणपत गोराणे, एकनाथ कांदळकर, पांडुरंग कांदळकर, बाळू कांदळकर यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.
राज्य सरकारने विधानसभा व विधानपरिषद दोन्ही सभागृहांमध्ये ठराव करून धनगर व धनगड हे एकच आहेत, अशी केंद्र सरकारला शिफारस करावी. केंद्र सरकारने विशेष अधिवेशन बोलावून आदेश काढून आरक्षण द्यावे किंवा राष्ट्रपती महोदयांनी वटहुकूम काढून धनगर समाजाला आरक्षण द्यावे. पदोन्नतीसाठी पात्र कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात यावी, पोलीस मेगा भरती तत्काळ सुरू करण्यात यावी, धनगर समाजाच्या उन्नतीसाठी मागील सरकारने मंजूर केलेला एक हजार कोटी रुपयांचा निधी तत्काळ देण्यात यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.सोपान कांदळकर, रेवणनाथ शिंदे व आण्णासाहेब कांदळकर यांनी समाजाला एसटी आरक्षण लागू करावे, अशी मागणी केली.