मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर एका तरुणीने बलात्काराचे आरोप केले. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी या प्रकरणावर खुलासा करत आपल्याला ब्लॅकमेल करण्यात येत असल्याचे म्हटले. या प्रकरणामुळे विरोधी पक्षाकडून मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर अडचणीत सापडलेले मुंडे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्या भेटीला गेले आहेत.
धनंजय मुंडे यांनी आज शरद पवार यांच्या मुंबई येथील सिल्वर ओक येथे जाऊन भेट घेतली. यावेळी त्यांनी या प्रकरणाविषयी पवार यांच्यासमोर आपली बाजू स्पष्ट केल्याचे समजते. वास्तविक पाहता, धनंजय मुंडे यांनी आधीच फेसबुकवर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. तसेच हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याचे सांगत यावर फारसं भाष्य करू नये, अशी विनंती माध्यमांना केली होती.
दरम्यान धनंजय मुंडे यांच्या मंत्रीपदावरून विरोधक आक्रमक झाले आहेत. चंद्रकांत पाटील यांनी ट्विट करून, सामाजिक न्यायमंत्री असलेल्या धनंजय मुंडे यांनी आपल्या चुकीच्या कृत्यांबद्दल तात्काळ राजीनामा द्यायला हवा. मुंडे यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप पाहता त्यांना मंत्रीपदावर राहण्याचा कोणताही हक्क नाही, असं म्हटले आहे. तर माजी खासदार किरीट सोमय्या यांनी देखील मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
दरम्यान धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांमुळे राष्ट्रवादी पक्षाचे नुकसान होण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या भवितव्याबाबत शरद पवार काय निर्णय घेणार पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.