मुंबई – अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या ‘धडकन’ या चित्रपटाला नुकतेच 23 वर्ष पूर्ण झाले आहे. या सुपरहिट चित्रपटाची आजही मोठी क्रेझ आहे. या चित्रपटात शिल्पा शेट्टीसह अभिनेता अक्षय कुमार आणि सुनील शेट्टी मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटातील त्यांच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले. 11 ऑगस्ट 2000 रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने लाखो लोकांची मनं जिंकली आहेत. या चित्रपटाला 23 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने शिल्पाने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली होती.
शिल्पा शेट्टीने इनस्टाग्राम स्टोरीला ‘धडकन’ चित्रपटातील फोटो शेअर करत प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. पोस्ट शेअर करत तिने लिहिले की, ‘अंजली, देव आणि राम यांना इतके वर्ष प्रेम दिल्याबद्दल खूप खूप आभार.’ या चित्रपटात शिल्पाने अंजलीची भूमिका साकारली होती. तर अक्षय कुमारने राम आणि सुनील शेट्टीने देवची भूमिका साकारली होती. या तिन्हीही पात्राला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला होता.
या चित्रपटातील कथाकथनसह सुंदर गाण्याने देखील प्रेक्षकांना वेड लावले. ‘दिल ने ये कहा है दिल से,’ ‘तुम दिल की धडकन में,’ आणि ‘दुल्हे का सेहरा’ सारखी गाणी आजही तितकीच खास आहेत आणि चाहत्यांच्या हृदयात एक स्थान निर्माण केले आहे. शिल्पा शेट्टीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झाल्यास, अभिनेत्री रोहित शेट्टीच्या ओटीटी पदार्पण ‘इंडियन पोलिस फोर्स’ मध्ये दिसणार आहे. यात ती सिद्धार्थ मल्होत्रा आणि विवेक ओबेरॉय सोबत झळकणार आहे.