पुणे – ‘देवेंद्रजी मी पुन्हा कोल्हापूरला जाणार आहे,’ “हे माझ्या विरोधकांना आताच सांगून टाकतो’, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील बोलताच सभागृहात हशा पिकला. मात्र, “विरोधक कोण?’ स्वत:च्या पक्षातील की विरोधी पक्षातील असा प्रश्न अनुत्तरित आहे.
पुण्यात एका कार्यक्रमानिमित्त भाजपतील दिग्गज नेते व्यासपीठावर उपस्थित होते. त्यावेळी भाषणांच्या फटकेबाजीत “कोण जीता कोण हारा’ हा प्रश्न उपस्थित होतो आहे. बालगंधर्व आणि भूगाव येथील कार्यक्रमांमध्ये चंद्रकांत पाटील आणि खासदार गिरीश बापट यांच्यातील भाषणांमधील मिश्किल टिप्पण्यांवर या दोघांच्या हजरजबाबीपणामुळे कार्यक्रमात राजकीय रंग भरला गेला.
पुणेरी “शालजोडी’तील भाषण करताना खासदार बापट म्हणाले की, “जगाच्या पाठीवर कुठे काहीही होऊ द्या आमच्या पुण्याचे लोक इतके हुशार, की त्या व्यक्तीचं आणि पुण्याचं “कनेक्शन’ लगेच जोडतात. अमेरिकेत जो बायडेन राष्ट्रपती झाले. तर, लगेच पुण्याच्या एका व्यक्तीने “बायडेन हे पुण्याचे. पूर्वीचे भिडे होते.’ “अहो इंदिरा गांधी पुण्याच्या हुजुरपागा शाळेत शिकल्या आणि बरं का…, देवेंद्र तुम्ही मुख्यमंत्री झाले कारण तुमचे काका पुण्याचे,’ असे म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला.
खासदार बापट यांची “बॅटिंग’ झाल्यावर आमदार चंद्रकांत पाटील यांनी फटकेबाजी सुरू करत “पुण्यात अनेक नेते घडले आहेत. कुठेही काही घटना घडली की त्याचं नातं पुण्याशी जोडले जाते. पुणे सगळ्या अर्थाने प्रगतीचं शहर आहे. त्यामुळे प्रत्येकाला वाटते की, पुण्यामध्ये “सेटल’ झाले पाहिजे. पण, देवेंद्रजी मी पुन्हा कोल्हापूरला जाणार आहे. हे माझ्या विरोधकांना सांगून टाकतो, असे पाटील यांनी स्पष्ट केले.
…कोणते घड्याळ?
भूगाव येथील शेतकरी मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील भाषणाला उभे राहताच, आज माझ्यापेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण महत्वाचे आहे. त्यामुळे माझे “घड्याळा’कडे लक्ष आहे, असे म्हणताच खासदार गिरीश बापट यांनी कोपरखळी मारत पाटील यांना कोणते “घड्याळ’ अशी विचारणा केली. त्यावर त्यांनी मिश्किल शब्दात ते घड्याळ बंद पडलेले आहे, त्याकडे माझे लक्ष नाही. हे माझ्या हातातल्या घड्याळाकडे लक्ष आहे, असे म्हणालो. त्यावर दोघेही हसले आणि पाटील यांनी भाषणाला सुरवात केली.