पुणे- शिक्षक विधानसभा मतदारसंघाच्या आचारसंहितेत फक्त करोना विषयक आणि आरोग्य विषयक अत्यावश्यक कामांनाच मंजूरी देता येत असल्याचा खुलासा महापालिका प्रशासनाकडून मंगळवारी स्थायी समितीत करण्यात आला. त्यामुळे महापालिकेची विकासकामे आणखी महिनाभर थांबणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
शिक्षक तसेच पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या आचारसंहितेबाबत संभ्रम आहे. त्यामुळे स्थायी समितीने महापालिका प्रशासनाने या आचारसंहितेत नेमकी कोणती विकासकामे करता येतील, तसेच कोणती कामे करता येणार नाहीत याबाबत खुलासा मागविला होता. त्यानंतर प्रशासनाने विभागीय आयुक्तांकडे पत्र पाठवत याबाबत स्पष्टता मागवली होती.
त्यानुसार, विभागीय आयुक्तांनी या काळात केवळ करोना विषयक कामांच्या कामांना मान्यता देता येईल. तसेच इतर कोणत्याही कामांच्या निविदांना तसेच धोरणात्मक निर्णयांना मान्यता देता येणार नसल्याचे पालिकेस कळवले आहे. त्यानुसार प्रशासनाने आपला अभिप्राय स्थायी समितीत सादर केला आहे. या काळात इतर कोणतीही विकासकामे करता येणार नसल्याचे स्पष्ट केले असल्याचे स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी सांगितले.