आपल्या अभिनयाने आणि आगळ्या-वेगळ्या स्टाइलने हिंदी सिनेसृष्टीवर अमिट असा ठसा उमटवणारा देव आनंद अनेकांचा लाडका अभिनेता. 26 सप्टेंबरला देव आनंदची जन्मशताब्दी आहे. त्यानिमित्त त्याच्या कारकिर्दीचा घेतलेला
लालित्यपूर्ण वेध…
देखो, मुझे भुलने की कोशिश मत करना… क्योंकि आसानी से भूल जाऊ
ऐसी मैं हस्ती नहीं, जिस दिल मे यारो जवानी की मस्ती नहीं, उस दिल में कभी मेरी बसती नहीं…
दम लागला ना ऐकताना? अहो, मग बोलताना काय होईल? साहेब हे टोपणनाव पहिल्यांदा घेतलं मीच. मैं ही हूँ वो दिवाना, याने के देव आनंद!
एक तरो-ताजा दिल. जवानीचं दुसरं नाव देव आनंद. सदाबहार हसरा चेहरा. हेअर स्टाइल एकदम झक्कास. साठ साली कोंबडा छाप कट तर नंतर कपाळ झाकणारी झुलपे, लिरिकल-रिमिक आणि तरोताजा गाण्यांचा खराखुरा उछलकुदवाला हिरो. स्टाइलचा निर्माता आणि संयमित अभिनयाचा आदर्श. अगदी करेक्ट भईय्या! मैं ही हूँ वो परवाना – याने के देव आनंद!
गाना मेरी जिंदगी का अहम हिस्सा हैं। असं जीव तोडून सांगणारा देव आनंद. गोबरे गोबरे गाल- ज्यामुळे त्याला नाव मिळालं चॉकलेट हिरो, बारीक डोळे अधिक बारीक करत संवाद फेकण्याची त्याची पद्धत, अरे जरा याद करो भाई – “जॉनी मेरा नाम’मध्ये तब्बल 53 शब्दांचं एक वाक्य एका दमात बोलून टाकलंय देव आनंदनं. लांबलचक पल्लेदार डायलॉग मारावेत ते देव सायबानंच. चॉकलेट हिरो. येस, सदाबहार हिरो, गाण्यांचा शौकीन. सहीरे सही बोंधू – मैं ही हूँ वो माशुक याने के देवआनंद.
देव आनंद! गाईड! टुरिस्ट गाईड! नव्हे, राजस्थानच्या वाळवंटात पर्यटनस्थळं दाखवता दाखवता जीवनाचा मार्ग दाखवणारा जिंदगीचा गाईड! प्रेम कसं करावं हे शिकवणारा रोमॅंटिक हिरो. हृदयातून उमलणारी प्रीतीचं फूल प्रियतमेच्या चरणी लीन होऊन अर्पण करणारा देव आनंद.
दु:खाचा लवलेश ज्याच्या वाट्यालाही येऊ नये असं ज्याच्याबद्दल आपल्याला वाटत राहातं तो देव आनंद.
अब तुम आगोशे-तसब्बुर में भी आया न करो
मुझसे बिखरे हुए गेसू नहीं देखे जाते
किती सांगावं काय सांगावं?
सुर्ख आँखों की कसम,
कॉंपती पलकों की कसम
थरथराते हुए आँसू नहीं देखे जाते
देव आनंद! सीआयडी, गाईड, काला बाजार, जॉनी मेरा नाम, किती नावं घ्यायची हिट पिक्चर्सची? वहिदा रेहमान, वैजयंतीमाला, हेमामालिनीपासून अगदी ऐंशीच्या दशकातल्या टीना मुनीमपर्यंत म्हणजे मुलीच्या वयाच्या शोभतील अशा नायिकांबरोबर त्यानं आपल्या फिल्मी करिअरची पानं सजवलीत. बॉलिवूडमधलं सदासतेज आणि सर्वात अजब रसायन म्हणजे… जी हॉं सही बताया ब्रदर… मैं वही हूँ सदियों का आशिक याने के देव आनंद!
एका बाजूला मान झुकवत, तिच्या नजरेला नजर देणारा, बोलता बोलता क्षणात गंभीर होणारा, तिच्या डोळ्यातून आता श्रावणधारा बरसू लागणार, असं दिसताच खदखदून हसवणारा तर कधी- हातापायातून वारं गेल्यासारख्या अगदी पॅरॅलिसिस झाल्यासारखे गंमतीदार हातवारे करत जंगलातून भटकणारा हॉं – वोही दिलका शहजादा – याने के देव आनंद!
देव आनंद! ऐंशी वर्षे उलटून गेली तरीही सतत कार्यमग्न राहिलेला जातिवंत कलाकार अनेक फिल्मफेअरसह राष्ट्रीय पुरस्कारांचा मानकरी महाबळेश्वरच्या फेड्रीक हॉटेलमध्ये गाईडच्या निर्मितीचं पेपरवर्क करताना दिवसातल्या 24 पैकी 48 तास काम करणारा जातिवंत फिल्मकार! तारुण्याचा धबधबा – झरा नव्हे! नावीन्याची ओढ, सामाजिक वास्तवाबद्दलची जागरूक जाण असणारा निर्माता-दिग्दर्शक. दम मारो दम सारख्या चित्रपटातून चरसींचं विकृत विश्व दर्शवणारा आणि हिप्पींच्या टोळीत अडकलेल्या युवा पिढीला पुनरुत्थानाचा मार्ग दाखवणारा देव आनंद!
देव आनंद हा बॉलिवूडचा आणखी एक सुपरस्टार होता ज्याने शेवटच्या श्वासापर्यंत सिनेमाची आवड गमावली नाही. शिवाय तो डाउन-टू-अर्थ आणि नम्र फिल्मस्टारदेखील होता जो इंडस्ट्रीने कधीचा पाहिला नाही. “रोमान्सिंग विथ लाइफ’ या त्याच्या आत्मचरित्रामध्ये देवने स्वत:चे आयुष्य ज्या प्रांजळपणाने मांडले आहे, त्याला तोड नाही. मुंबईमध्ये स्वत:ची कार स्वत: चालवणारा, कधीही मद्यपान न करणारा, दररोज व्यायामासह योगासने करणारा, पर्यायाने संपूर्ण शाकाहारी असलेला लेटनाइट पार्ट्यांमध्ये अजिबात उपस्थित न राहणारा हा ऑड-मॅन-आऊट म्हणजेच देव आनंद. अतिशय वक्तशीर आणि पहाटे 4 वाजल्यापासून सलग 16 तास काम करू शकणारा निर्माता, दिग्दर्शक आणि अभिनेता म्हणजे देव आनंद.
देव आनंद यांचा जन्म गुरुदासपूर जिल्ह्यातील (आता पाकिस्तानमध्ये) शंकरगढ तहसीलमध्ये झाला. त्यांचे वडील पिशोरी लाल आनंद हे वकील होते. तिसरा मुलगा देव याला डलहौसी येथील शाळेत पाठवण्यात आले. त्यालाही मोठा भाऊ चेतनप्रमाणे इंग्लंडमध्ये शिकण्याची अपेक्षा होती, पण तोपर्यंत वडिलांची प्रॅक्टीस कमी झाली होती. खिशात 30 रुपये घेऊन देव नौदल कमिशनच्या आशेने मुंबईला आले.
देव यांनी इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशन इप्टासाठी चेतनच्या सौजन्याने काही थिएटर काम केले होते आणि त्याची दखल घेतली गेली. “प्रभात फिल्म्स’ नवीन तरुण कलाकाराच्या शोधात आहे हे ऐकल्यावर देव आपले उत्तम कपडे घालून पुण्याच्या “प्रभात’मध्ये गेला. मग मात्र देव साहेबांनी मागे वळून पाहिले नाही.
सुसंस्कृत शहरी रोमॅंटिक म्हणूनही त्यांनी स्वत:चे नाव कमावले आणि आजही चित्रपटसृष्टीला दिशा देणारा आदर्श निर्माण केला.
हिरव्या, कच्च्या भाज्या, फळे आणि संतुलित आहार घेऊन, दैनंदिन व्यायामासह अठरा तास काम करणारा देव आनंद खराखुरा लिव्हिंग लिजंड होता. जीवनावर विलक्षण प्रेम करणारा देव आनंद! दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला तेव्हाही देवआनंद महाबळेश्वरातच एका पिक्चरवर काम करत होता. तिसऱ्या दिवशी पत्रकारांनी त्याला फाळके पुरस्काराविषयी प्रतिक्रिया विचारली तेव्हा वो तो पुरानी बात हुई, भाई, कोई नयी खबर सुनाओ असं त्याच्या व्यक्तित्वाला साजेसं उत्तर त्यानं दिलं.
लहानपणी एक सुविचार वाचला होता. “केस वाढवून देव आनंद होण्यापेक्षा बुद्धी वाढवून विवेकानंद व्हावे…’ पण विवेकानंदांविषयी पुरता आदर ठेवूनही म्हणावसं वाटतं – “केस वाढवून देव आनंद होता येत असतं तर बुद्धी वाढवणाराही प्रत्येकजण विवेकानंद झाला असता. पण नाही झाले विवेकानंद नंतर. नाही झाला देव आनंदही परत!’
गाजलेली गाणी
* शोखियों मे घोला जाये… (प्रेम पुजारी)
* पल भर के लिये… (जॉनी मेरा नाम)
* खोया खोया चॉंद… (काला बाजार)
* दिन ढल जाये… (गाईड)
* ये दिल ना होता बेचारा (ज्वेल थिफ)
* में जिंदगी का साथ निभाता चला गया… (हम दोनो)
* दम मारो दम… (हरे रामा हरे कृष्णा)
* हैं अपना दिल तो आवारा …(सोलवां साल)
* ना तुम हमे जानों… (बात एक रात की)
* छोड दो आँचल जमाना क्या कहेगा… (पेईंग गेस्ट)
गाजलेले सिनेमे
गाईड, ज्वेल थिफ, जॉनी मेरा नाम
हरे रामा हरे कृष्णा, हम दोनो
काला बाजार, तेरे मेरे सपने
सीआयडी, बंबई का बाबू, पेईंग गेस्ट
– श्रीनिवास वारुंजीकर