Ambadas Danve On MLA Disqualification : राज्यात मागील काही दिवसांपासून आमदार अपात्रतेचे घोंगडे भिजत पडले आहे. त्याही सध्या सुनावणी सुरु आहे मात्र अद्याप कोणताही निर्णय देण्यात आला नाही. याच मुद्द्यावरून आताविधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी विधानसभा अध्यक्षांवर निशाणा साधला आहे..
अंबादास दानवे (Ambadas Danve) आज नागपूरमध्ये माध्यमांशी संवाद साधत होते. त्यावेळी ते म्हणाले, “विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणजे प्राधिकरण (ट्रिब्युनल) आहे. त्यामुळे त्यांच्याकडून अपेक्षा आहे की, त्यांनी फक्त अपात्रता कायद्याचा अर्थ लावावा. तुम्हाला जो अर्थ लावायाचा तो लावा. आमच्या बाजूने लावा किंवा आमच्या विरोधात लावा.” असे त्यांनी यावेळी म्हटले.
पुढे बोलताना त्यांनी “आमच्याच बाजूने अर्थ लावा असं आमचं म्हणणं नाही. जो अर्थ लावायाचा तो लावा मात्र कायद्याच्या कसोटीवर घासून लावा. मला वाटतं त्यांना कायद्याच्या कसोटीवरच निर्णय द्यावा लागेल, अशी परिस्थिती निर्माण होत आहे,” असे मत व्यक्त केले.
अंबादास दानवे (Ambadas Danve) पुढे म्हणाले, “निकालाच्या तारखा आपल्याला जाहीर करता येत नाही. निकालाच्या तारखा आपल्या हातात नसतात. परंतु सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश होते की, लवकरात लवकर निकाल द्या. ११ मे २०२३ रोजी हा निकाल लागल्यानंतर आता सप्टेंबर महिना संपत आला आहे, अजूनही या विषयाची सुनावणी सुरू झालेली नाही. अध्यक्ष राहुल नार्वेकर अद्यापही प्रक्रिया कशी करायची यातच गुंतले आहेत. यातच सगळं राजकारण गुंतलं आहे.”
“म्हणून या अध्यक्षांवर कुणाचा दबाव आहे का? राहुल नार्वेकर सुनावणी घेण्याआधी या काळात कुणाकुणाला भेटले, काय मार्गदर्शन घेतलं, कुणी काय मार्गदर्शन केलं याची एकदा माहिती घेतलीच पाहिजे. हे आमच्यावर दबाव टाकतात असं म्हणतात, पण यांच्यावर दबाव कुणाचा आहे. यांच्यावर केंद्रातील भाजपा नेत्यांचा दबाव आहे की, राज्यातील भाजपा नेत्यांचा दबाव आहे का. हे कोणत्या दबावाखाली काम करतात याचीही आगामी काळात माहिती घेतली पाहिजे,” असेही दानवेंनी (Ambadas Danve) म्हटले.