नारायणगाव -निमगाव सावा (ता. जुन्नर) हद्दीतील जाधववाडी गावात कुकडी नदीकिनारी सुरू असलेल्या गावठी हातभट्टीवर आळेफाटा पोलिसांनी छापा टाकला. यावेळी सुमारे 4 लाख 70 हजार रुपये किमतीचे सुमारे 4 हजार 700 लिटर तयार गावठी दारू बनविण्याचे कच्चे रसायन जप्त करून जागीच नष्ट केले. याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पंग्या निकम (रा. निमगावासावा, ता. जुन्नर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. तर पोलीस कॉन्स्टेबल सचिन डामसे यांनी फिर्याद दिली आहे. पोलीस निरीक्षक मुजावर म्हणाले की, जाधववाडी येथे कुकडी नदीच्या किनारी एका झुडुपात एक व्यक्ती गावठी दारू बनवीत असल्याची माहिती सहायक फौजदार एस. व्ही. घाडगे यांना मिळाली होती.
त्यामुळे मुजावर यांच्या मार्गदर्शनाखाली, घाडगे, सचिन डामसे, रफिक तडवी, पांडुरंग साबळे, विनायक भागवत यांनी त्या ठिकाणी जाऊन छापा टाकला असता पंग्या दारू बनवित होता. त्याला पोलिसांची चाहूल लागताच तो पळून गेला.