नवी दिल्ली- एप्रिल महिन्यात सेवा क्षेत्राची उत्पादकता वाढली आहे. महागाई उच्चांकी पातळीवर जाऊनही या क्षेत्राची उत्पादकता वाढली असल्याचे दिसून येत आहे. एप्रिल महिन्यासाठीचा सेवा क्षेत्राचा पर्चेसिंग मॅनेजर इंडेक्स म्हणजे पीएमआय 54.7 इतका मोजला गेला आहे.
मार्च महिन्यामध्ये हा निर्देशांक 54 इतका होता. करानाचे निर्बंध दूर झाल्यामुळे देशांतर्गत विक्रीबरोबरच परदेशातील विक्री या कालावधीत वाढत असल्यामुळे आणि निर्देशांक वाढला असल्याचे दिसून येते. मात्र काही राज्यात करोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळे आगामी काळामध्ये परिस्थिती कसे रूप घेते यावर बरेच काही अवलंबून आहे. एकूण परिस्थिती पाहता आगामी काळातही हा निर्देशांक दीर्घकाळ 50 च्या वर राहण्याची शक्यता आहे असे हा निर्देशांक तयार करणाऱ्या एस अँड पी ग्लोबल या संस्थेच्या संचालक पॉलीना डि लीमा यांनी सांगितले. मार्च महिन्यामध्ये नऊ महिन्यानंतर प्रथमच निर्यात कमी झाली होती. मात्र एप्रिल महिन्यामध्ये पुन्हा निर्यात वाढत असल्याचे दिसून येत आहे.
मात्र देशात आणि परदेशात वाढत असलेल्या महागाईमुळे या क्षेत्रासमोर काही प्रश्न निर्माण झाले आहेत. रशिया- युक्रेन युद्धांमुळे महागाई आणखीच वाढली आहे. त्या अगोदर करोनासाठी दिलेल्या सवलतीमुळे भारतासह विविध देशात महागाई वाढत होती. आता या महागाईचा सामना भारताबरोबरच इतर देशांनाही करावा लागणार आहे. रिझर्व बॅंक आणि अर्थ मंत्रालय महागाईचे प्रमाण कमी ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे.
मात्र परदेशातही महागाई वाढत असल्यामुळे आयात महाग पडत आहे. अशा परिस्थितीमध्ये मागणीवर काही प्रमाणात परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे त्यांनी सांगितले. एप्रीलमध्ये रोजगार निर्मितीमध्ये फारशी वाढ झाली नाही. मात्र विविध उद्योगाच्या आत्मविश्वासात वाढ झाली असल्याचे दिसून येत आहे. पहिल्या तिमाहीचे ताळेबंदात जाहीर होत आहेत. त्यावरून उद्योग क्षेत्रातील नेमक्या परिस्थितीचा अंदाज येण्यास मदत मिळणार आहेत.