पुणे – पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातील वर्षानुवर्षे “भानगडी’चा कारभार करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात प्रशासनाला यश आलेले नाही. त्यातच हे कार्यालय एजंटच्या विळख्यात सापडले आहे. त्यामुळे येथील कारभारात सुधारणा करण्यात अनेक अडथळे पार करावे लागणार आहे.
पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने वादाच्या भोवऱ्यात सापडल्याचे आढळून येते. शालार्थ आयडी, वैयक्तिक मान्यता, सांकेतांक क्रमांक, विषय मान्यता, नवीन शाळा व तुकडीवाढ, दर्जावाढ मान्यता या विविध कामांसाठी व त्याच्या पाठपुराव्यासाठी शिक्षक, कर्मचारी व संघटनांचे पदाधिकारी कार्यालयात सतत हेलपाटे मारत असतात.
कार्यालयाच्या आवारात पाच-सहा एजंट सतत तळ ठोकून असतात. यात काही संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचाही समावेश आहे. शिक्षक, कर्मचारी, पालक यांच्या कोणत्याही कामाच्या फायली जमा करण्यापासून ते मान्यता मिळविण्याच्या सर्व कामांचा ते पाठपुरवठा करत असतात. यात लाखो रुपयांच्या उलाढाली होत असल्याने बोलले जाते. सहजासहजी कामे मार्गी न लागल्यास काही मंडळींना एकत्रित करून आंदोलनाचा इशाराही ही एजंट मंडळी देतात.
पुणे विभागीय शिक्षण उपसंचालकपदी औदुंबर उकिरडे यांची गेल्या डिसेंबरमध्ये पूर्णवेळ पदावर नियुक्ती झाली. त्यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्याचा प्रयत्न केला. मात्र, अद्यापही त्यात त्यांना पुरेसे यश आलेले नाही.
एकाच कार्यालयात एकाच पदावरील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्याही झालेल्या नाहीत. तसेच कोणाच्या टेबलचे कामही बदललेले नाही. एजंटचा कायमस्वरूपी बंदोबस्त झालेला नाही. उकिरडे यांना कार्यालयातील कामकाजाला पारदर्शकतेचे स्वरूप देण्यासाठी ठोस व धाडसी पावले टाकावीच लागणार आहेत.
दरम्यान, काही अधिकारी, कर्मचारी कार्यालयाच्या सुट्टीच्या दिवशी कार्यालयात येऊन काम करण्याचा आव आणतात. भानगडीच्या फायली मार्गी लावण्यासाठी या सुट्टीच्या दिवसाच्या कामाचा उपयोग केला जातो.
कर्मचाऱ्यांच्या बदल्या पोकळच ठरल्या
पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातील एकाही बड्या अधिकाऱ्यांची आताच्या बदली हंगामात बदली झालेली नाही. केवळ पाच कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. 25 कर्मचाऱ्यांना पदोन्नत्या मिळाल्या आहेत. यामुळे बदल्या व पदोन्नत्यातून मुख्य कार्यालयात फार काही बदल झालेला नाही. काही जणांना सोयीच्या ठिकाणी बदल्या व पदोन्नत्या दिल्याची चर्चाही आहे.