मुंबई – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. ठाकरेंचं निवासस्थान असलेल्या ‘शिवतीर्थ’वर ही भेट पार पडली. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर ठाकरे आणि फडणवीस यांच्यातील ही पहिलीच भेट आहे. शिवसेना भाजपासून दूर गेल्यानंतर राज ठाकरे हे भाजपच्या चांगलेच जवळ आल्याचे पाहायला मिळाले.
गेल्या काही महिन्यांमध्ये राज ठाकरेंनी मशिदीवरच्या भोंग्याला विरोध करत जोरदार शक्तिप्रदर्शन केलं होत. त्यानंतर आगामी महापालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजप मनसे एकत्र येणार का ? याच्या जोरदार चर्चा सुरु झाल्या होत्या. त्यामुळे ठाकरे फडणवीसांच्या आजच्या भेटीला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. ही भेट या आधीच होणार होती मात्र काही कारणास्तव भेटीचा मुहूर्त लांबणीवर पडला होता.
देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर राज ठाकरेंनी त्याचं पत्र लिहून अभिनंदन केलं होत. ज्याचा उल्लेख स्वतः फडणवीसांनी सभागृहात केला होता. तसेच राज ठाकरे आजारी होते ते बरे झाल्यानंतर त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेणार असलयाचे देखील फडणवीसांनी सांगितले होते. त्यामुळे आज झालेली भेट ही पूर्वनियोजित असली तरी राजकीय वर्तुळात मात्र पुन्हा एकदा मनसे भाजपच्या युतीच्या चर्चेला उधाण आले आहे.