मंचर – करोना व्हायरसचा सर्वाधिक धोका हा दंतवैद्यक यांना असून रुग्णांचा संबंध हा थेट तोंडाशी येत असल्याने उत्तर पुणे जिल्ह्यातील आंबेगाव, जुन्नर व खेड तालुक्यातील दातांचे दवाखाने लॉकडाऊन कालावधीत बंद राहतील, असा निर्णय इंडियन डेंटल असोसिएशनच्या दंतवैद्यकांच्या शिवनेरी शाखेने घेतला आहे.
महाराष्ट्र डेन्टल कौन्सिलने फक्त इमर्जन्सी रुग्णांसाठी अत्यावश्यक गरज असल्यास तरच ऑपरेट करावे, असे यापूर्वीच जाहीर केले आहे. तसेच महाराष्ट्र राज्य इंडियन डेंटल असोसिएशनने देखील दंतोपचार सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. करोना विषाणूंचा संसर्ग दातांच्या दवाखान्यातून जास्त प्रमाणात होतो. दात, हिरडी, दातांमधील रक्तस्राव, रुटकॅनल, दातदुखी विविध उपचारांसाठी रुग्ण येत असतात. त्याचा थेट संपर्क तोंडाशी येतो.
दंत उपचारात पाणी आणि हवेचा फवारा वापरला जातो. त्याद्वारे लाळ, थुंकी उडून करोनाचा प्रादुर्भाव होण्याचा मोठा धोका असतो. अध्यक्ष डॉ. अरुण मांढरे म्हणाले की , दातांचे दवाखाने संसर्गाचे स्थान होऊ शकते. त्याचा धोका दंतवैद्यक तसेच येणाऱ्या रुग्णांना आहे, त्यामुळेच करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी दातांचे दवाखाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
डॉ. हरिष खामकर म्हणाले की, सर्वाधिक धोक्याच्या सेवेत दंतवैद्यक प्रथम स्थानावर आहेत. काही ठिकाणी डॉक्टरांना रुग्णापासून करोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. दंतसेवा ठप्प झाल्यामुळे रुग्णांना याचा त्रास होणार आहे. दंतवैद्यक फोनवरुन रुग्णांना आवश्यक ते उपचार, औषध सांगतील, असे असोसिएशनने जाहीर केले आहे.