सोशल डिस्टन्सची ऐशी-तैशी
पिंपरी : मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने महापालिकेने पिंपरी भाजी मंडई बंद केली होती. मात्र राजकीय मध्यस्थीनंतर आज शुक्रवारीपासून (दि. १०) पुन्हा मंडई सुरू झाल्याने नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली.
सोशल डिस्टन्सिंगचे पालन होत नसल्याने पिंपरी चिंचवड महानगर पालिकेने येथील फेरीवाल्यांवर मोठ्या प्रमाणात कारवाई करून पिंपरी भाजी मंडई बंद केली होती. यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. तसेच फेरीवाल्यांवरही उपासमारीची वेळ आल्याने ही भाजी मंडई पुन्हा सुरू करण्यासाठी काही राजकीय व्यक्तींनी महापालिकेवर दबाव आणला.
महापालिकेनेही काही अटी शर्तींवर पिंपरीतील भाजी मंडई पुन्हा सुरू करण्यास परवानगी दिली. त्यानुसार आज शुक्रवारपासून भाजी मंडई पुन्हा सुरू झाली. मात्र भाजी मंडईमध्ये कोणत्याही प्रकारचे सोशल लिस्टिंग पाळले जात नसल्याचे पुन्हा एकदा दिसून आले. यामुळे करोना आजाराचा प्रसार होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.