वॉशिंग्टन – अमेरिकेतील भारतीय वंशाचे आणि डेमोक्रॅटिक पक्षाचे खासदार श्री ठाणेदार यांच्या निवासस्थानाबाहेर पॅलेस्टाईन समर्थक आणि इस्रायल विरोधी निदर्शकांनी मध्यरात्रीच्या सुमारास जोरदार निदर्शने केली आहेत. इस्रायल-हमास युद्धाबाबत ठाणेदार यांच्या भूमिकेवरून ही निदर्शने करण्यात आली.
ठाणेदार यांच्या घराबाहेर जमलेल्या निदर्शकांनी जोरजोराने वाहनांचे हॉर्न वाजवले आणि आरडाओरडा केला. हमासविरुद्ध इस्रायल करत असलेल्या कारवाईचे समर्थन केले जाते आहे.
मात्र गाझामध्ये इस्रायलच्या हल्ल्यात मरण पावलेल्या पॅलेस्टिनींच्या मृत्यूबाबत ठाणेदार यांनी मौन का बाळगले आहे, असा प्रश्न हे निदर्शक करत होते. ठाणेदार यांनी या निदर्शकांचा एक व्हिडीओ एक्सवर पोस्ट केला आहे.
ठाणेदार यांनी आपल्या प्रचारासाठीच्या वेबसाईटवर इस्रायलचे जोरदार समर्थन केले आहे. इस्रायलला स्वतःच्या स्वातंत्र्याचे रक्षण करण्याचा अधिकार आहे, असे त्यांनी म्हटले आहे. हमास ही एक क्रूर दहशतवादी संघटना असून ही संघटना संपवण्याची गरज असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
ठाणेदार यांनी अलिकडेच अमेरिकेतील हिंदू, शीख, बौद्ध आणि जैनांची संघटना स्थापन केली आहे. मूळचे महाराष्ट्रातील आणि बेळगावमध्ये शिक्षण झालेले श्री ठाणेदार अमेरिकेत जाऊन यशस्वी उद्योजक झाले आहेत.