महाळुंगे इंगळे (वार्ताहर) – जनता कर्फ्यूनंतर संचारबंदी व लॉकडाऊन सुरु असताना अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली घराबाहेर पडून शेलपिंपळगाव (ता. खेड) गावच्या हदीत विनापरवाना व अवैधरीत्या दारूच्या हातभट्ट्या चालविणाऱ्यांवर तातडीची कारवाई करण्याची मागणी सरपंच विद्या मोहिते व ग्रामविकास अधिकारी उत्तम कांबळे यांनी केली आहे.
तीन दिवसांपूर्वी ग्रामपंचायत व आरोग्य विभाग यांच्या वतीने शेलपिंपळगाव येथे विनापरवाना सुरु असलेल्या गावठी दारूच्या हातभट्ट्या जेसीबीच्या सहाय्याने उद्धस्त करण्यात आल्या होत्या. तर प्लॅस्टिक साहित्यासह एकूण पाच लाखांचा कच्चा माल जाळण्यात आला.
संचालक सयाजीराजे मोहिते यांच्या नेतृत्वाखाली संतप्त ग्रामस्थांनी हा दारूचा धंदा उद्ध्वस्त केला. मात्र, त्यानंतर तेथून गायब झालेल्या दारू विक्रेत्यांचा अद्याप थांगपत्ता लागलेला नाही.