मुंबई – आयपीएल 2022 च्या 32 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाने पंजाब किंग्जचा नऊ गडी राखून पराभव केला. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना पंजाबने मोसमातील सर्वात कमी धावसंख्या उभारली. 115 धावा करून संघ सर्वबाद झाला. पंजाबच्या सात फलंदाजांना दुहेरी धावसंख्या करता आली नाही.
प्रत्युत्तरात दिल्ली संघाने 10.3 षटकांत एक गडी गमावून लक्ष्य गाठले. पृथ्वी शॉने 20 चेंडूत 41 धावा केल्या आणि डेव्हिड वॉर्नरने 30 चेंडूत 60 धावांची नाबाद खेळी केली. सरफराज खान याने नाबाद 12 धावा केल्या. पंजाबकडून राहुल चहरने 1 गडी बाद केला.
दिल्लीच्या संघाने 11व्या षटकातच हा सामना जिंकला. त्यामुळे त्याचा नेट रनरेट खूप वाढला आहे. ऋषभ पंतचा संघ तीन विजय आणि तीन पराभवांसह सहा सामन्यांतून सहा गुणांसह गुणतालिकेत सहाव्या क्रमांकावर आहे. त्याचबरोबर पंजाब संघाचा सात सामन्यांतील हा चौथा पराभव ठरला. संघ तीन विजय आणि सहा गुणांसह आठव्या क्रमांकावर आहे. पंजाबचा नेट रन रेट खूपच कमी आहे. दिल्लीचा संघ आता 22 एप्रिलला राजस्थान रॉयल्सशी भिडणार आहे. त्याचवेळी पंजाबचा संघ 25 एप्रिलला चेन्नईविरुद्ध खेळणार आहे.
What a way to return to winning ways! 👏 👏@DelhiCapitals put up a dominant show & sealed a clinical 9⃣-wicket win over #PBKS. 👌 👌
Scorecard ▶️ https://t.co/3MYNGBm7Dg#TATAIPL | #DCvPBKS pic.twitter.com/6YpYU4bh18
— IndianPremierLeague (@IPL) April 20, 2022
तत्पूर्वी, दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतने नाणेफेक जिंकत पंजाबला पहिल्यांदा फलंदाजी दिली. त्याचा हा निर्णय सुरुवातीला वेगवान गोलंदाज खलिल अहमदने तर नंतर फिरकी त्रिकुट कुलदीप, ललित व अक्सरने सार्थ ठरवला. कुलदीप यादव, ललित यादव व अक्सर पटेल यांच्या फिरकीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने पंजाब किंग्जचा डाव 20 षटकांत 115 धावांवर संपुष्टात आणला.
सलामीवीर कर्णधार मयंक आग्रवालने धडाक्यात सुरुवात केली होती. मात्र, त्याला समोरून चांगली साथ लाभली नाही. तोदेखील धावांचा वेग वाढवण्याच्या प्रयत्नात 15 चेंडूत 4 चौकार फटकावून 24 धावांवर बाद झाला. त्यानंतर पंजाबचे फलंदाज ठरावीक अंतराने बाद होत गेले.
जीतेश शर्माने आपल्या उपयुक्त 32 धावांच्या खेळीत 23 चेंडूत 5 चौकार फटकावले. त्यानंतर तळात शाहरुख खान व राहुल चहने प्रत्येकी 12 धावांची खेळी केली व संघाला शतकी मजल मारून दिली. दिल्लीच्या कुलदीप, ललित, अक्सर व अहमद यांनी प्रत्येकी 2 बळी मिळवले. मुस्तफिजूर रेहमानने 1 गडी बाद केला.