भावनगर – दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी त्यांचे सहकारी आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना 2 ते 3 दिवसांत अटक होण्याची शक्यता असल्याचे म्हटले. त्यासाठी त्यांनी गुजरातमध्ये आपला मिळणाऱ्या वाढत्या पाठिंब्याचे कारण पुढे केले.
सिसोदिया यांच्या निवासस्थानावर सीबीआयने नुकताच छापा टाकला. त्या कारवाईनंतर केजरीवाल यांनी सिसोदिया यांच्या समवेत गुजरातचा दोन दिवसीय दौरा केला. दौऱ्याच्या अखेरच्या दिवशी त्यांनी येथे स्थानिक जनतेशी संवाद साधला. त्यावेळी बोलताना केजरीवाल म्हणाले, सिसोदिया यांना 10 दिवसांत अटक होऊ शकते, असे आधी आम्हाला वाटत होते. पण, गुजरातमधील जनतेकडून आपला मिळणारा पाठिंबा वाढत आहे.
ते पाहता सिसोदिया यांना लवकरच अटक होण्याची चिन्हे आहेत, अशी पुस्ती त्यांनी जोडली. सिसोदिया यांच्यावरील सीबीआय कारवाईचा संबंध आप गुजरातमधील आगामी विधानसभा निवडणुकीशी जोडत आहे. ती निवडणूक ताकदीने लढवण्याचा निर्धार आपने केला आहे. आमच्या वाढत्या प्रभावाने सत्तारूढ भाजप धास्तावल्याचा दावा आपकडून केला जात आहे.