नवी दिल्ली – दिल्ली विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान मंगळवारी एक वेगळी घटना पाहायला मिळाली. सभागृहात गोंधळ घातल्याचा आरोपाखाली भाजप आमदारावर कारवाई करण्यात आली आहे. विजेंदर गुप्ता असं कारवाई केलेल्या भाजप आमदाराचे नाव आहे. सत्ताधारी पक्षाच्या ठरावावर सभापतींशी वाद घातल्याने त्यांची वर्षभरासाठी सभागृहातून हकालपट्टी करण्यात आली आहे.
भाजपचे आमदार विजेंदर गुप्ता यांच्यावर सभागृहाचे कामकाज होऊ न दिल्याचा आणि सभागृहात गोंधळ घालण्याचा आरोप आहे. या कारवाईवर विजेंदर गुप्ता म्हणाले की, हा माझ्यावर अन्याय आहे. या निर्णयाचा पुनर्विचार करण्याचे आवाहन त्यांनी केले. मात्र, विधानसभा अध्यक्षांनी त्यांचे ऐकले नाही आणि विजेंदर गुप्ता यांना सभागृहातून बाहेरचा रस्ता दाखवला.
विजेंदर गुप्ता यांची सभागृहातून हकालपट्टी केल्याच्या निषेधार्थ विरोधकांनी सभागृहात जोरदार निदर्शने केली. त्याचवेळी विरोधी पक्षनेते म्हणाले की, अर्थसंकल्प मांडलाच नसताना मग चर्चा कशी? अर्थसंकल्पावरील चर्चेला विरोधकांनी विरोध केला आहे. त्याचवेळी सत्ताधारी पक्षाचे आमदार मुख्य सचिव, उपराज्यपाल आणि केंद्र सरकारवर अर्थसंकल्प मांडू न शकल्याचा ठपका ठेवत आहेत. दुसरीकडे विरोधी पक्षाचे सदस्य सभागृहावर बहिष्कार टाकून बाहेर गेले.
गदारोळात मंगळवारी संध्याकाळी दिल्ली सरकारला अर्थसंकल्प सादर करण्यास केंद्रीय गृहमंत्रालयाकडून मंजुरी मिळाली आहे. यासंदर्भात केंद्र सरकारने दिल्ली सरकारला कळवले आहे.मात्र भाजप आमदाराच्या निलंबनावर विरोधकांनी सभागृहात चांगलाच हंगामा केला.