देहूगाव (रामकुमार आगरवाल) –
चला पंढरीशी जाऊ ! रखुमादेवीवरा पाहू !
डोळे निवतील कान ! मना तेथे समाधान !
संता महंता होतील भेटी ! आनंदे नाचो वाळवंटी!
अशा अभंगाच्या पंगती गुणगुणत विठ्ठल भक्तीच्या ओढीने “ज्ञानोबा.. माऊली ..तुकाराम…’ या हरिनामाच्या गजरात,टाळ, चिपळ्या, मृदुंगाच्या गजरात वैष्णवांचा मेळा जगद्गुरू संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांची जन्मभूमी, कर्मभूमी असलेल्या तीर्थक्षेत्र देहूतून फुलांच्या वर्षावात भावपूर्ण निरोप घेत…. आपले निस्सिम मुस्लिम भक्त अनगडशहाबाबाच्या दर्ग्याला भेट देऊन… सीओडी डेपोजवळ स्वागत स्वीकारत… शनी मंदिर जवळ विसावा घेत…. भारतीय सैन्य दलाला दर्शनाचा लाभ देत… देहूरोड कॅन्टोन्मेटचे स्वागत स्वीकारून… पालखी सोहळा पिंपरी चिंचवडकडे रवाना झाला.
भागवत धर्माची पताका खांद्यावर घेऊन विठुरायाच्या दर्शनाला आतुरलेला वैष्णवांचा मेळा संत तुकाराम महाराजांच्या पालखी रथासह रविवारी (दि. 11) पुण्यनगरी देहूतील इनामदार वाड्यातून सकाळी अकराच्या सुमारास तिर्थक्षेत्र पंढरपूरकडे मार्गस्थ झाला. तत्पूर्वी, सकाळी भागवत बुवा गोळेगावकर यांचे कीर्तन झाले. देहूतील इनामदार वाड्यात जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख यांनी सपत्नीक दर्शन घेतले. पोलीस आयुक्त विनयकुमार चोबे, उपजिल्हाधिकारी संजय असवले, सुनिता सप्तनीक, तहसीलदार डॉ. अर्चना निकम, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, ललिता सपत्नीक, श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे यांच्या हस्ते पाद्यपूजन झाले. इनामदार वाड्यातील दिलीप गोसावी, पोलीस आयुक्त काकासाहेब डोळे, नायब तहसीलदार प्रवीण ढमाले, मंडलाधिकारी ज्योती भुजबळ, अतुल गीते, सचिन मोरे, विकास फुके, ग्रामविकास अधिकारी अर्जुन गुडसूरकर, देहू नगराध्यक्षा स्मिता चव्हाण, उपनगराध्यक्षा शितल हगवणे, पालखी सोहळा प्रमुख, संस्थानचे आजी-माजी अध्यक्ष, विश्वस्त, महाराजांचे वंशज व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.
अकराच्या सुमारास पालखी मार्गस्थ
महाराजांची पालखी इनामदार वाड्यातून अकराच्या सुमारास बाहेर पडली. पालखी मार्गाने सोहळा छत्रपती शिवाजी चौकात आल्यावर ग्रामस्थ आणि नगरपंचायतीच्या वतीने तसेच जिल्हा परिषदेचे आरोग्य विभागाच्या वतीने प्रत्येक जिल्ह्यातील विणेकरांना कापडी पिशवी, प्राथमिक उपचाराची कीट नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, सर्व नगरसेवक आणि उपस्थित सामाजिक कार्यकर्ते, ग्रामस्थ व कर्मचाऱ्यांचे हस्ते देऊन सत्कार करण्यात आला. ग्रामस्थांचा निरोप घेत पालखी प्रवेशद्वाराजवळ येताच पालखीवर पुष्पवृष्टी करण्यात आली. भाविकांनी आणि खांदेकऱ्यांनी पालखी अनगडशहा बाबांच्या दर्ग्यापर्यंत आणली. दर्ग्याजवळील मेघडंबरीत सोहळ्यातील पहिली अभंग आरती झाली. आरतीनंतर खांदेकऱ्यांनी पालखी फुलांनी सजविलेल्या रथात ठेवली. येलवाडी येथील सुरेश मोरे यांच्या सोन्या- खासदार यांच्या पांढऱ्याशुभ्र खिल्लारी बैल रथाला जुंपण्यात आली होती. वंशपरंपरे प्रमाणे बाळू पांडे यांनी चौघडा वाजविला. चौघड्याच्या बैलगाडी मागे बाभुळगावकर आणि मोहिते पाटील यांचे अश्व चालू लागली. रथाच्या पुढे परंपरेतील जुन्या 25 दिंड्या आणि रथाच्या मागे सुमारे 375 दिंड्यासह पालखी मार्गस्थ झाली.
ठिकठिकाणी झाले पालखीचे जंगी स्वागत
मार्गावरील माळवाडी, बोडकेवाडी, पाटीलमळा, काळोखे मळा, हगवणे मळा, लक्ष्मीनगर परिसरातील नागरिकांनी पालखीचे दर्शन घेतले. सीओडी डेपो जवळ डेपोचे ब्रिगेडियर मनोज कुमार शर्मा यांनी कर्नल मनोज सक्सेना, कर्नल संजीव कुमार, मेजर अनंत कुमार, कॅप्टन नीती रावत, कामगार आयुक्त हरमनदीप सिंह, संजय दुमडे, पदाधिकारी आणि कर्मचारी, कामगार संघटना आदींच्या उपस्थितीत पालखीचे स्वागत करीत ब्रिगेडियर शर्मा यांनी पालखीचे सारथ्य केले.दुपारी दोनच्या सुमारास चिंचोली शनी मंदिरजवळ पालखी पोहचली. शनि मंदीर ट्रस्टचे दत्तात्रय जाधव, बाळासाहेब जाधव गोविंद वेगळे रमेश जाधव ट्रस्टचे सदस्य तसेच चिंचोली ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत पादुकांची आरती झाली. तासाभराच्या विसाव्यानंतर पालखी अशोकनगर मार्गे देहूरोड येथे येताच देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित कुमार माने, अधीक्षक लक्ष्मण तनपुरे, माजी नगरसेवक, कर्मचारी आणि शहरवासीयांचा निरोप स्वकारत पुणे-मुंबई महामार्गावरून पिंपरी चिंचवड शहराकडे मार्गस्थ झाली.