पुणे – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी मुंबई पोलिसांनी एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. सागर बर्वे (वय 34) असे या तरुणाचे नाव आहे, तो एक आयटी इंजिनीअर आहे. या आरोपीला पुण्यातून अटक करण्यात आली आहे. स्थानिक न्यायालयाने आरोपीला १३ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपीने फेसबुकवर ‘नर्मदाबाई पटवर्धन’ नावाचे पेज तयार केले होते. ‘तुझा दाभोळकर केला जाईल’ अशा स्वरूपाची धमकी ट्विटरच्या माध्यामातून शरद पवारांना देण्यात आली होती. या प्रकरणानंतर सुप्रिया सुळेंनी पोलीस आयुक्तांची भेट घेतली होती. तसेच या प्रकरणी लवकरात लवकर धमकी देणाऱ्याला अटक करण्यात यावी अशी मागणी गृहखात्याकडे केली होती. याशिवाय काही बरं वाईट झालं तर याला पूर्णपणे देशाचे आणि राज्याचे गृहखाते जबाबदार असेल असेही त्या म्हणाल्या होत्या. त्यानंतर तातडीने कारवाई करत एकाला पुण्यातून अटक करण्यात आली आहे. तर दुसरीकडे शरद पवारांना ज्या ट्विटर अकाउंटवरून धमकी देण्यात आली, त्याच्या बायोमध्ये मी भाजप कार्यकर्ता आहे असा उल्लेख आहे. या ट्विटर युजरचे नाव सौरभ पिंपळकर असे असून त्याने त्याच्या बायोमध्ये “मी भाजपचा कार्यकर्ता आहे. मला धर्मनिरपेक्षतेचा तिरस्कार आहे” असं लिहिलेलं आहे. सौरभ पिंपळकर नावाच्या ट्विटर हँडलवरुन शरद पवार यांची औरंगजेबासोबत तुलना करत आक्षेपार्ह भाषेचा वापर केलेला मजकूर प्रसिद्ध करण्यात आला होता. या दोन्ही घटना व्हायरल झाल्यानंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. त्यानंतर आता एकाला अटक करण्यात आली आहे. आरोपीने धमकी देण्यामागचे कारण काय होते याचा आता पोलिस अधिक तपास करत आहेत.