कर्जत – राज्यात सत्ताबदल होताच कर्जत तालुक्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांच्या निकालात प्रा. राम शिंदे यांनी आमदार रोहित पवार यांना धक्का दिला आहे. कर्जत तालुक्यातील कुळधरण, कोरेगाव व बजरंगवाडी या तीनही ग्रामपंचायती राम शिंदे गटाच्या ताब्यात गेल्या आहेत.
राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या कर्जत तालुक्यातील कोरेगाव ग्रामपंचायतमध्ये भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्याच गावात राष्ट्रवादीला पराभवाला सामोरे जावे लागले. कोरेगाव ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपने १३ पैकी ७ जागांवर विजय मिळवत ग्रामपंचायतीवर वर्चस्व मिळवले आहे. युवराज शेळके यांच्या नेतृत्वाखाली भाजपने कोरेगाव ग्रामपंचायतीवर आपला झेंडा फडकावला आहे.
जिल्हाध्यक्षांच्या गावातच राष्ट्रवादीचा पराभव झाल्याने राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीआधी राष्ट्रवादीचा दिग्गज नेत्यांच्या गावातच पराभव झाल्याने आमदार रोहित पवारांसाठी ही धोक्याची घंटा मानली जात आहे.