बॉलीवूडमधील आघाडीची अभिनेत्री दीपिका पादुकोणच्या “पद्मावत’ चित्रपटाचे बॉक्स ऑफिसवर कथित यश मिळविले होते. या चित्रपटानंतर तिने रणवीर सिंहसोबत लग्न करण्यासाठी काही काळ ब्रेक घेतला होता. त्यानंतर आता ती “छपाक’ चित्रपटातून वापसी करत आहे. या चित्रपटाबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता असतानाच दीपिका आणखी एका बिग बजेट चित्रपटात काम करणार असल्याचे समजते. दीपिका “महाभारत’मध्ये द्रौपदीच्या भूमिकेत झळणार आहे.
हा चित्रपट अनेक भागात साकारण्यात येणार आहे. याचा पहिला भाग 2021मधील दिवाळीत प्रदर्शित करण्यात येणार आहे. “महाभारत’ चित्रपटाची अधिकृत घोषणा होताच चाहत्यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत चित्रपटाबाबतची उत्सुकता वाढविली आहे.
चित्रपटाबाबत मधु मंटेना म्हणाले, आपण सर्वांनी अनेकवेळा महाभारत ऐकले, वाचले आणि पाहिलेले आहे. मात्र, हा चित्रपट द्रौपदीची भूमिका नजरेसमोर ठेवून साकारण्यात येणार आहे. दीपिकाबाबत सांगायचे झाल्यास ती एक उत्कृष्ट अभिनेत्री असून या भूमिकेला ती योग्य न्याय देवू शकते. तिने होकार दर्शविला नसता तर हा चित्रपट साकारणे कठीण होते, असे मंटेना यांनी सांगितले.