दीपक पवारांचा दणदणीत विजय

आमदार शिवेंद्रराजेंना धक्का; कुडाळ जिल्हा परिषद पोटनिवडणुकीच्या प्रतिष्ठेच्या लढतीत माजी आमदार शशिकांत शिंदेंचे वर्चस्व सिद्ध

कुडाळ – कुडाळ जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार दीपक पवार यांनी विरोधी अपक्ष उमेदवार मालोजी शिंदे यांचा दारुण पराभव करीत गटात पुन्हा एकदा “दीपक पवार’च हे सिद्ध केले. माजी आमदार शशिकांत शिंदे व भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले या आजी-माजी आमदारांनी आपापले उमेदवार विजयी करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केल्यामुळे ही निवडणूक दोघांच्याही प्रतिष्ठेची झाली होती. मात्र, या निकालाने माजी आमदार शशिकांत शिंदे यांनी पुन्हा एकदा जावळीत आपले राजकीय वर्चस्व सिद्ध केले आहे.

या पोटनिवडणुकीसाठी बुधवारी मतदान झाले होते. माजी आमदार शशिकांत शिंदे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार दीपक पवार यांच्यासाठी तसेच भाजप आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी अपक्ष मालोजी शिंदे यांना विजयी करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले होते. त्यामुळे प्रतिष्ठेच्या बनलेल्या या निवडणुकीत माजी आमदार शशिकांत शिंदे यांनी राजकीयदृष्ट्या मजबूत असल्याचे दाखवून दिले. तर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना या निकालाने फटका दिला आहे. या पोटनिवडणुकीसाठी एकूण 15 हजार 551 इतके मतदान झाले होते. यापैकी दीपक पवार यांना नऊ हजार 922 मते मिळाली तर मालोजी शिंदे यांना चार हजार 434 मते मिळाली. दीपक पवार यांनी तब्बल 5488 इतक्‍या मतांच्या फरकाने विजय मिळवला. विजयानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यानी गुलालाच्या उधळणीत व फटाक्‍यांच्या आतषबाजीत दीपक पवार यांची विजयी मिरवणूक काढत विजयोत्सव साजरा केला. प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, जावळीचे तहसीलदार शरद पाटील व गटविकास अधिकारी सतीश बुध्दे यांनी मतमोजणी प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी काम पाहिले.

विधानसभा निवडणुकीच्या वेळी दीपक पवार यांनी राजीनामा दिल्यामुळे कुडाळ गटात पोटनिवडणूक झाली. मात्र, यावेळी दीपक पवार भाजपऐवजी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून रिंगणात होते. यापूर्वी या गटात त्यांच्यामुळेच कमळ फुलले होते. ते या निकालामुळे कोमेजले. दीपक पवारांनी आपली मजबूत पकड ठेवल्यामुळेच मतदारांनी या पोटनिवडणुकीत भरघोस मतांनी निवडून देत त्यांनाच पुन्हा संधी दिली. कुडाळच्या या पोटनिवडणुकीत दोन आजी- माजी आमदार आमनेसामने आल्यामुळे ही निवडणूक अत्यंत लक्षवेधी ठरली होती.

भाजपने थेट उमेदवार दिला नसला तरी भाजप आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आपली संपूर्ण ताकद अपक्ष उमेदवार मालोजी शिंदे यांच्या पाठीशी उभी केली होती. माजी आमदार शशिकांत शिंदे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून दीपक पवारांना निवडणूक रिंगणात उतरवले होते. प्रचारात विधानसभेत काय घडलं- बिघडलं यावर जोरदार आरोप-प्रत्यारोप झडले होते. त्यामुळे ही निवडणूक अटीतटीची होणार अशी चिन्हे होती. मात्र, शशिकांत शिंदे यांचे निवडणुकीतील मायक्रो प्लॅनिंग यशस्वी ठरले. तर दीपक पवारांनी कुडाळ गटात कामांच्या माध्यमातून आपला जनसंपर्क ठेवल्यामुळे त्यांच्यावर गटातील जनतेने पुन्हा एकदा विश्‍वास ठेवला.

Leave A Reply

Your email address will not be published.