सावधान…! शौचालय अनुदानास ब्रेक

संतोष पवार
सातारा  – निर्मलग्राम, हागणदारीमुक्‍त गाव या योजना जिल्ह्यात प्रभावीपणे राबवण्यात आल्याने जिल्हा परिषदेला अनेक पुरस्कार मिळाले आहेत. जिल्ह्यातील संपूर्ण स्वच्छता अभियानातील कामाची दखल दिल्ली दरबारीही घेण्यात आली आहे. शौचालयाविना एकही कुटुंब राहू नये यासाठी जनजागृती करत शौचालय बांधकामासाठी अनुदानही देण्यात येत होते. आता मात्र राज्य शासनाने शौचालय अनुदानास ब्रेक दिला आहे. जे लाभार्थी दि. 20 डिसेंबरपर्यंत ग्रामपंचायत अथवा पंचायत समितीकडे नोंदणी करतील, तेच अनुदानास पात्र ठरणार आहेत.

जिल्हा परिषदेच्या माध्यमातून निर्मलग्रामसाठी भरीव काम झाले आहे. धामणेर, ता. कोरेगाव, निढळ, ता. खटाव, मान्याचीवाडी, ता. पाटण, आसगाव, ता. सातारा, कातळगेवाडी, ता. खटाव, लोधवडे, ता. माण आदी गावांनी स्वच्छता अभियानात बाजी मारली आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे, विद्यमान मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) अविनाश फडतरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (स्वच्छता व पाणी) किरण सायमोते यांच्या पुढाकाराने विविध योजना मार्गी लावून जिल्हा निर्मलग्राम करण्यात यश आले. पाणी व स्वच्छता विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी गावोगावी भेटी दिल्या. कार्यशाळा, चर्चासत्रे, ग्रामसभांच्या माध्यमातून स्वच्छतेची चळवळ उभी राहिली. या उपक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर व प्रसारमाध्यमांनी सकारात्मक भूमिका बजावली.

परिणामी जिल्ह्यातील अनेक गावे स्वच्छता अभियान, निर्मलग्राम, हागणदारीमुक्त गाव अभियानात राज्यात चमकली. जिल्ह्यातील स्वच्छतेच्या कामाचा गौरव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाला होता. डॉ. कैलास शिंदे आणि जिल्हा परिषद उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे यांनी हा सन्मान स्वीकारला होता. जिल्ह्यातील एकही कुटुंब शौचालयापासून वंचित राहू नये यासाठी जिल्हा परिषदेने पुढाकार घेतला होता. पंचायत समिती व ग्रामपंचायत स्तरावर सर्वेक्षण करून शौचालयांना अनुदान देण्यात आले. त्यातून गावोगावी, घरोघरी शौचालये बांधण्यात आली. या कार्यामुळे देशभरातील अनेक ग्रामपंचायतींच्या शिष्टमंडळांनी सातारा जिल्ह्यातील आदर्श गावे पाहण्यासाठी अभ्यास दौरे झाले. जिल्ह्यातील निर्मल गावांच्या धर्तीवर राज्यातील अनेक गावांमध्ये उठाव होऊन उपक्रम राबवण्यात आले आहेत.

जिल्ह्याने शौचालय बांधकामाचे दिलेले उद्दिष्ट पूर्ण केले असून दि. 20 डिसेंबर ही शौचालय नोंदणी करण्याची शेवटची मुदत आहे. पात्र कुटुंबांना शौचालय अनुदानाची ही शेवटची संधी असेल. यापुढे शौचालय बांधकामास शासनाकडून अनुदान मिळणार नसल्याचे संकेत आहेत. शासनाने अनुदान सुरू ठेवण्यासाठी जिल्हा परिषदेचे पदाधिकारी पाठपुरावा करणार का, याकडे उर्वरित लाभार्थ्यांचे लक्ष आहे.

टी. आर. गारळे यांचे भरीव योगदान
जिल्हा परिषदेने स्वच्छता अभियान, निर्मलग्राम, हागणदारीमुक्त गाव या योजनांमध्ये केलेल्या उल्लेखनीय कामामुळे जिल्हा परिषदेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला होता. या कामाचे खरे श्रेय तत्कालीन उपमुख्य कार्यकारी अधिकारी टी. आर. गारळे यांना द्यावे लागेल. गारळे यांना जिल्ह्यातील गावन्‌गाव माहीत असल्याने त्यांना ग्रामस्थांचा व सामाजिक कार्यात पुढे असलेल्या व्यक्तींची नेहमीच मदत झाली. स्वच्छतेबाबत जिल्हा परिषदेच्या गौरवाचे श्रेय गारळे यांनाही द्यावे लागेल.

पंचायत समिती, ग्रामपंचायतींचाही पुढाकार
सातारा जिल्हा निर्मलग्राम करण्यासाठी जिल्हा परिषदेने मिळवलेल्या यशात पंचायत समिती, ग्रामपंचायतींचे पदाधिकारी, अधिकारी यांचेही मोलाचे सहकार्य लाभले आहे. प्रत्येक गावात जनजागृती करुन गाव हागणदारीमुक्त करण्यासाठी मोठा उठाव झाल्याने सातारा जिल्ह्याचे नाव देशपातळीवर पोहाचले आहे. हा नावलौकिक कायम ठेवण्याचे काम जिल्हा परिषदेचा पाणी व स्वच्छता विभाग करताना दिसत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.