सातारा – आपल्या प्रभागातील कामे होत नसल्याच्या निषेधार्थ नगरविकास आघाडीचे नगरसेवक बाळू उर्फ विनोद खंदारे यांनी शुक्रवारी सकाळी उपमुख्याधिकारी संचित धुमाळ यांच्या टेबलावर शौचालयातील बादली ठेवून स्वतःची पॅंट उतरवण्याचे लज्जास्पद वर्तन केल्याने सातारा पालिकेत गोंधळ झाला.
पालिका कर्मचाऱ्यांनी खंदारे याच्या कृत्याचा निषेध करत काम बंद आंदोलन केले. पालिकेत दहशतमुक्त वातावरण तयार होत नाही तोपर्यंत काम करणार नाही, असा इशारा कर्मचाऱ्यांनी देत नगराध्यक्ष माधवी कदम यांना निवेदन दिले. खंदारे यांच्या या वादग्रस्त वर्तनामुळे नगरविकास आघाडीच्या नेतृत्वाची कोंडी झाली आहे. प्रभाग 7 मधील शौचालयाच्या कामांचे प्रस्ताव स्थायी समितीच्या अजेंड्यावर घेतले जात नसल्याची नगरसेवक खंदारे यांची तक्रार होती.
आपले विषय जाणीवपूर्वक अडवले जात असल्याचा त्यांचा समज झाला. त्यामुळे खंदारे यांनी शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजता उपमुख्याधिकारी संचित धुमाळ यांच्या केबिनमध्ये प्रवेश केला. आधी त्यांच्या टेबलावर शौचालयातील बादली ठेवली. तुम्ही आमची कामे करत नाही, आता मी इथेच घाण करतो, असे म्हणत खंदारे तावातावाने धुमाळ यांच्या टेबलवर चढले आणि स्वतःची पॅंट गुडघ्यापर्यंत खाली घेतली.
धुमाळ यांनी खंदारे यांना खाली उतरवून त्यांची समजूत घातली आणि सभा सचिव अतुल दिसले यांना बोलावून घेत स्थायी समितीचा अजेंडा वाचायला दिला. विषयपत्रिकेवर शंभर व एकशे एक या क्रमांकावर आपले विषय घेण्यात आल्याचे दिसताच खंदारे पॅंट घालून खुर्चीत बसले. मात्र, मुख्याधिकारी व नगराध्यक्षांच्या केबिनमध्येही घाण करणार, अशी त्यांची बडबड सुरुच होती. थोड्या वेळाने ते निघून गेले.