दीपा मलिक

पॅरा ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिल्यांदा पदक मिळवून देणारी भारताची महिला ऍथलिट दीपा मलिक यांना क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. दीपा मलिक या पुरस्कारासाठी सर्वार्थाने लायक खेळाडू आहेत. दीपा मलिक यांना हा पुरस्कार देऊन सरकारने त्यांचा उचित गौरव केला आहे. राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार मिळवणाऱ्या दीपा मलिक या पहिल्या महिला दिव्यांग खेळाडू आहेत.

वयाच्या 17 व्या वर्षी त्यांच्या मणक्‍याला गाठ आली होती. त्यामुळे त्यांना चालणे तर दूरच पण उभे देखील राहता येत नव्हते. ही गाठ काढण्यासाठी त्यांच्यावर तब्बल 31 वेळा शस्त्रक्रिया करावी लागली होती, तरीही त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहता आले नाही. 31 वेळा शस्त्रक्रिया करूनही कमरेखालचा भाग निकामीच झाला होता. दीपा मलिक यांच्याबाबत जे घडले, ते इतरांच्या बाबतीत घडले असते तर ती व्यक्ती कोलमडून पडली असती, हताश झाली असती, पण दीपा मलिक यांनी मात्र या शारीरिक व्यंगावर मात केली. रडायचं नाही तर लढायचं असा निर्धार करुन त्यांनी जीवनाच्या लढाईत हार न मानता जी आपली कमजोरी आहे तिलाच आपली शक्ती बनवायचे असे ठरवले. या दरम्यान त्यांना दिव्यांगांसाठी देखील ऑलिम्पिक स्पर्धा असते याची माहिती मिळाली आणि ऑलिंपिकमध्ये भारतासाठी पदक मिळवायचे हेच त्यांचे ध्येय बनले.व्हीलचेअरवर बसून गोळा फेक, भाला फेक, थाळी फेक करणाऱ्या दीपा या चांगल्या जलतरणपटूही आहेत.

आंतरराष्ट्रीय स्तरावर या तिन्ही क्रीडा प्रकारात त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. नुसतेच प्रतिनिधित्व नाही तर पदकेही मिळवली आहेत. 2009 साली त्यांनी गोळाफेकमध्ये पहिल्यांदा ब्रॉन्झ पदक मिळवले होते. पुढच्याच वर्षी इंग्लंडमध्ये झालेल्या स्पर्धेत त्यांनी गोळा फेक, भाला फेक आणि थाळी फेक या तिन्ही क्रीडा प्रकारात भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. त्याच वर्षी चीनमध्ये झालेल्या एशियन गेम्स मध्ये ब्रॉन्झ पदक मिळवले. 2011 साली झालेल्या ऍथलेटिक्‍स चॅम्पियनशिपमध्ये त्यांनी रौप्यपदक तर शारजहामध्ये झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये दोन ब्रॉन्झपदके मिळवली.

2012 मध्ये झालेल्या मलेशिया ओपन ऍथलॅटिक्‍स चॅम्पियनशिपमध्ये भाला फेक व थाळी फेकमध्ये दोन सुवर्णपदके मिळवली. 2016 मध्ये चीनमध्ये झालेल्या स्पर्धेत त्यांनी गोळा फेकमध्ये सुवर्णपदक मिळवले. त्याचवर्षी झालेल्या एशियन गेम्समध्ये त्यांनी पुन्हा रौप्यपदक मिळवले. त्याचवर्षी दुबई मध्ये झालेल्या स्पर्धेतही त्यांनी पदके मिळवले. त्यांच्या कारकिर्दीतील सर्वोच्च क्षण याचवर्षी आला. त्यांच्या जीवनाचे जे ध्येय होते ते त्यांना पूर्ण करता आले. 2016 मध्ये झालेल्या रिओ पॅराऑलिम्पिकमध्ये त्यांनी गोळाफेक या क्रीडाप्रकारात रौप्यपदक मिळवले. पॅराऑलिम्पिकमध्ये पदक मिळवणाऱ्या त्या पहिल्याच महिला खेळाडू ठरल्या. त्यांची ही दैदिप्यमान कामगिरी खेलरत्न पुरस्कारासाठी पुरेशी आहे.

दीपा मलिक या देशातील युवा खेळाडुंच्या प्रेरणास्त्रोत आहेत. कठोर परिश्रम जिद्द व चिकाटी या गुणांमुळेच दीपा मलिक यांनी आपल्या शारीरिक व्यंगावर मात करीत हे यश मिळवले आहे. जिद्द चिकाटी आणि कष्ट करण्याची तयारी असेल तर या जगात काहीही अशक्‍य नाही हे दाखवत दीपा मलिक यांनी देशाची मान उंचावली आहे. दीपा मलिक यांचे मनापासून अभिनंदन.

– श्‍याम बसप्पा ठाणेदार 

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)